रॅगिंग प्रकरणी शिक्षकांसह त्या अल्पवयीन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल
सावंतवाडी । प्रतिनिधी
अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या रॅगिंग प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका प्रसिद्ध निवासी विद्यालयाच्या मुख्याध्यापक व दोन शिक्षकांसह पाचही अल्पवयीन विद्यार्थ्यांवर सावंतवाडी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक श्री अमोल चव्हाण यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध निवासी विद्यालयात पाच विद्यार्थ्यांनी आपल्या खालच्या वर्गातील विद्यार्थ्यांवर रॅगिंग केल्याचे उघड झाले होते. पालकांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती व लेखी तक्रार दिली होती. या लेखी तक्रारीनंतर सावंतवाडी पोलिसांनी सखोल चौकशी करत त्यानंतर मंगळवारी मध्यरात्री मुख्याध्यापक व दोन शिक्षक व सदर पाच अल्पवयीन विद्यार्थी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . त्या अल्पवयीन विद्यार्थ्यांनी त्यांच्या खालच्या वर्गातील विद्यार्थ्यांना मारहाण करून धमकावून तसेच त्यांच्याकडून अनेक प्रकार करून घेतले होते . या पाच विद्यार्थ्यांना पाठीशी घातल्या प्रकरणी तीन शिक्षकांवरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात परराज्यातील काही विद्यार्थी निवासी व्यवस्थेसाठी या विद्यालयात शिकत आहेत . त्यातील तीन विद्यार्थी व जिल्ह्यातील दोन विद्यार्थी अशा एकूण पाच विद्यार्थ्यांनी गेल्या काही महिन्यात आपल्या खालच्या वर्गातील विद्यार्थ्यांवर रॅगिंग प्रकार केला होता. ही बाब विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या कानी घातल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याची गंभीर दखल जिल्हाधिकारी यांनी घेतली आहे. शिक्षण विभाग देखील या प्रकाराची सखोल चौकशी करत आहे. या रॅगिंग प्रकरणी केंद्रस्तरावरून चौकशी समिती नेमली जाण्याची शक्यता आहे. असे सूत्रांनी स्पष्ट केले .