सुभाष वेलिंगकर विरोधात गुन्हा नोंद
विविध पोलीस स्थानकांत तक्रारी दाखल : पणजी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज : प्रा. वेलिंगकर यांना अटक करण्याची मागणी
पणजी / मडगाव
सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्यासंदर्भात हिंदुत्ववादी नेते प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केलेल्या वादग्रस्त निवेदन तथा आक्षेपार्ह वक्तव्यास दक्षिण गोव्यातील ख्रिस्ती नागरिकांनी जोरदार व तीव्र पद्धतीने विरोध दर्शवून मडगाव शहराला येणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी केली. त्यांच्या या चक्काजामचे परिणाम अनेक भागात उमटू लागले असून आज गोव्यातील काही भागांमध्ये ख्रिस्ती नागरिक रस्ते अडवून आपला निषेध व्यक्त करणार आहेत. निषेध करणाऱ्यांनी प्रा. सुभाष वेलिंगकर यांना त्वरित अटक करा, अशी जोरदार मागणी सरकारकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर डिचोली पोलिसांनी वेलिंगकर यांच्या पणजीतील घरावर वॉरंट नोटीस चिकटवली आहे. वेलिंगकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली असून. त्यावर उद्या सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.पोलीस वेलिंगकर यांच्या शोधार्थ निघाले असून त्यांना त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. दरम्यान, वेलिंगकर समर्थकांनी देखील मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे राज्यातील धार्मिक वातावरण चिघळले आहे. मुख्यमंत्र्यांनी जनतेला शांत राहण्याचे आवाहन केले आहे.
सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने राज्यातील ख्रिस्ती लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी सुभाष वेलिंगकर यांच्या विरोधात राज्यातील विविध पोलीस स्थानकात तक्रारी दाखल झाल्या असून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम 35(3) अंतर्गत त्यांना नोटीस बजावून चौकशीला बोलावण्यात आले आहे. वेलिंगकर यांच्या शोधात सध्या पोलीस असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या कामासाठी विविध पथके तयार करून त्यांचा शोध सुऊ आहे. तर वेलिंगकर यांनी पणजीतील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान वेलिंगकर यांना फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद असल्याचे आढळून आले आहे. वेलिंगकर यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाल्यानंतरही शनिवारी सकाळी ख्रिस्ती बांधवांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत मडगाव पोलीस मुख्यालयाबाहेर गर्दी केली. त्यानंतर ओल्ड मार्केट सर्कलकडे जात वाहतूक रोखत अटक होईपर्यंत आंदोलन करण्याचे ठरवले. या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यात मोठ्या प्रमाणात अडकलेल्या नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागला.
पर्वरीत आज वेलिंगकर समर्थकांचे शक्तिप्रदर्शन!
सुभाष वेलिंगकर यांच्या अटकेची मागणी करीत शनिवारी झालेल्या आंदोलनानंतर सुभाष वेलिंगकर समर्थकांनी पर्वरी येथे सभा बोलविली आहे. आज हिंदूनी एकत्र होणे काळाची गरज आहे, असे जाहीर करीत रविवारी सकाळी 10 वाजता पर्वरीतील स्वामी विवेकानंद सभागृहात ही सभा बोलविण्यात आली आहे. त्यामुळे आज पर्वरीत वेलिंगकर समर्थकांचे शक्तिप्रदर्शन होणार आहे.
प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्याविरोधात वॉरंट जारी
दरम्यान, डिचोली पोलीस स्थानकात प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या विरोधात आलेल्या तक्रारीनंतर पोलीस उपनिरीक्षक विराज धाऊसकर यांनी सुभाष वेलिंगकर यांच्या विरोधात दखलपात्र गुन्हा नोंदवून घेतला असून त्यासंदर्भात त्यांच्या विरोधात वॉरंट जारी केला आहे. त्यांच्या घराच्या दारावर एक नोटीस लावली असून त्यात त्यांनी शनिवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत डिचोली पोलीस स्थानकात हजेरी लावावी, असा आदेश जारी केला आहे, मात्र वेलिंगकर हे डिचोली पोलीस स्थानकात पोहचलेच नाहीत. त्यामुळे ही नोटीस सार्वजनिक जाहीर करण्यात आली. त्यांना पोलीस स्थानकावर बोलावून यानंतर अशाप्रकारचे भडकावू भाषण करणार नाही, जनतेच्या धार्मिक भावना दुखावणार नाहीत हे त्यांच्याकडून वदवून घेणार होते, मात्र वेलिंगकर यांनी हजेरी लावली नसल्याने त्यांना नव्याने आणखी एक नोटीस जारी करण्याचे पोलिसांनी ठरविले. तसेच त्यांचा शोध घेण्यासाठी सर्वत्र व अनेक ठिकाणी पोलिसांना पाठविण्यात आले आहे. वेलिंगकर यांना लागू करण्यात आलेली कलमे पाहता त्यांना न्यायालयात जामीन मिळणे कठीण होऊन बसणार आहे.