बंदी आदेश लागू असताना राष्ट्रीय महामार्ग रोखल्याप्रकरणी राजू शेट्टी आणि अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
पुलाची शिरोली प्रतिनिधी
जिल्ह्यात बंदी आदेश लागू असताना बेकायदेशीपणे जमाव एकत्रित करून पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांच्यासह सुमारे अडीच हजार कार्यकर्त्यांच्यावर शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ठाणे अंमलदार निलेश कांबळे यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.
मागील हंगामातील ऊसाला चारशे रुपये व चालू हंगामात तुटणाऱ्या ऊसाला ३५०० रुपये दर द्यावा. याबाबत माजी खासदार शेट्टी यांनी सुमारे दीड महिना कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलन केले होते. हा दराचा योग्य तोडगा निघाला नसल्यामुळे माजी खासदार शेट्टी यांनी गुरुवारी शेतकरी व कार्यकर्त्यांचा मोठा जमाव गोळा करून सभा घेत मिरवणूक काढत पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले होते. हे आंदोलन सुमारे नऊ तास सुरू होते. या कालावधीमध्ये राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांना ये-जा बंद होती. तसेच प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला होता. यामुळे माजी खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील , जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष विक्रम पाटील, अरुण माळी, राहूल पाटील, जनार्दन पाटील, स्वस्तिक पाटील, अशोक ऐतवडे, शरद पाटील, बंडू पाटील, सागर मादनाईक, अजित पोवार, शाहरुख पेंढारी, अनिल चव्हाण यांचे सह सुमारे अडीच हजार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.