महिलेवर अत्याचार प्रकरणी एकावर गुन्हा दाखल
कराड :
विवाहाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधिताने महिलेचे व्हिडिओ आणि फोटो काढून बदनामी करण्याची धमकी दिली. तसेच मुलाला नोकरी लावतो, असे म्हणून महिलेची आर्थिक फसवणूक केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
संतोष यशवंत साठे (वय 50, रा. म्हासोली, ता. कराड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
पीडित महिला कराड तालुक्यातील एका गावात वास्तव्यास आहे. म्हासोली येथील संतोष साठे याने संबंधित महिलेला विवाहाचे आमिष दाखवून 31 डिसेंबर 2023 ते 1 जानेवारी 2025 या कालावधीत तिच्यावर अत्याचार केला. तिच्या नकळत व्हिडिओ, फोटो काढून बदनामी करण्याची धमकी दिली. मुलाला आणि नातवाला ठार मारण्याची धमकीही त्याने दिली. तसेच मुलाला नोकरी लावतो, असे म्हणून त्याने महिलेकडून 1 लाख 15 हजार रुपये घेतले होते. मात्र, मुलाला नोकरी न लावता महिलेची फसवणूक केली. कराडनजीकचा एक बार चालवण्यासाठी त्याने महिलेकडे दोन लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र, पैसे देण्यास नकार दिल्यामुळे त्याने महिलेला शिवीगाळ, दमदाटी केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून संतोष साठे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.