असगणी सरपंच,उपसरपंचांसह 400 हून अधिक जणांवर गुन्हा
खेड :
मनाई आदेश लागू असतानाही तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील हिंदुस्थान कोकाकोला ब्रेव्हरेज कंपनीवर मूकमोर्चा काढून आदेशाचा भंग केल्याप्रकरणी असगणीचे सरपंच, उपसरपंच यांच्यासह 400 हून अधिक जणांवर येथील पोलीस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिकांना डावलत परप्रांतियांना कंपनीत सामावून घेतले जात असल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी कंपनीवर धडक दिली होती.
सरपंच संजना संजय बुरटे, उपसरपंच यासीन फरीक घारे, सदस्य प्रमोद पांडुरंग चांदिवडे, चंद्रकांत राजाराम गोसावी, सुवींद्र रामचंद्र धाडवे, शाहिन इस्माईल कादरी, रिया सचिन बाईत, मेघना भाऊ नायनाक यांच्यासह चेतन चंद्रकांत पवार, संजय सखाराम बुरटे, अनंत विठ्ठल नायनाक, इस्माईल हसन कादरी, हुसैन करीम ठाकूर, विवेक वासुदेव नायनाक, संजय आंब्रे, उस्मान हसन झगडे, गंगाराम धोंडू इप्ते, संजय तुळशीराम मोहिते यांच्यासह अन्य अज्ञात 400 हून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असगणी ग्रामस्थांनी गुरुवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत असगणी ग्रामपंचायत कार्यालय ते हिंदुस्थान कोकाकोला ब्रेव्हरेज कंपनीच्या बाहेरील रस्त्यावरून कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत मूकमोर्चा काढला. मूकमोर्चा काढण्यापूर्वी येथील पोलीस ठाण्याकडून मनाई आदेशाबाबत नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसीसह मनाई आदेशाला न जुमानता मूकमोर्चा काढत भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत पोलीस कॉन्स्टेबल विनायक येलकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.