मयत अंजलीच्या दोन्ही भावांवर गुन्हा दाखल
सातारा :
सातारा शहरातील मंगळवार पेठेत राहत असलेल्या अंजली शिंदे हिचा खून तिच्या पती राजेंद्र शिंदेने केला. या रागातून तिच्या दोन्ही भावांनी त्याला पाईपने मारहाण केल्याने तो जखमी झाला आहे. याप्रकरणी राजेंद्रचा भाऊ महेश भानुदास शिंदे (वय 42, रा. पानमळेवाडी पो. वर्ये ता. सातारा) याने शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोघाविरूद्ध तक्रार दिली. त्यानुसार अभिषेक अनिलकुमार पाटील, श्रेयस अनिलकुमार पाटील (दोघे रा. करंजे सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुक्रवारी रात्री मंगळवार पेठेत राहत असलेला राजेंद्र शिंदे याने पत्नी अंजलीचा चारित्र्याच्या संशयावरून खून केला. तिचा मृतदेह कपड्यात गुंडाळून कॉटखाली ठेवला होता. या घटनेची माहिती अंजलीचे भाऊ अभिषेक व श्रेयस यांना कळताच ते तिच्या घरी गेले. यावेळी राजेंद्र हा चाकू घेऊन दोघांना मारण्यासाठी धावला. या तिघांच्यात झटापट झाली. तोच दोघांनी पडद्याच्या पाईप काढून त्याला मारहाण केली. या मारहाणीत तो जखमी झाला. पोलिसांना यांची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी राजेंद्रला उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. राजेंद्र शिंदे याचा भाऊ महेश शिंदे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अभिषेक व श्रेयस यांच्याविरूद्ध तक्रार दिली. अधिक तपास पोलीस हवालदार सणस करत आहेत.
- विष घालून मारल्याचा प्राथमिक अंदाज
मयत अंजली शिंदे हिचा खून राजेंद्रने कसा केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याला ही मारहाण झाल्याने त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला नसल्याचे शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी सांगितले. परंतु प्राथमिक अंदाजात त्याने विष देऊन मारले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.