तुळजापूरला निघालेल्या बसला लागली अचानक आग
उमरगा :
बसवकल्याण वरून तुळजापुरला निघालेल्या बसला अचानक आग लागली. ही घटना खेड शिवारात लोकमंगल साखर कारखान्याजवळ शुक्रवारी (दि.११) सकाळी पावणे नऊच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला होता. लोकमंगलच्या अग्निशामक दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. बसमधील ६५ प्रवाशांनाही सुखरूप बाहेर काढल्यामुळे या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, बसवकल्याण- तुळजापूर ही बस (बस क्रमांक एम एच २० बी एल २०९२) बसवकल्याणकडून तुळजापूरकडे जात होती. माकणी, खेड येथील प्रवाशांची चढ उतार झाल्यानंतर लोकमंगल कारखान्याजवळ प्रवासी उतरण्यासाठी बस थांबवली. यावेळी बसच्या इंजिनने अचानक पेट घेतला. यावेळी बसमध्ये ६५ प्रवासी होते.
कर्तव्यावर असलेले चालक एम. व्ही घंटे व वाहक बी एस. गोरे यांनी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. बस पेटलेली पाहून लोकमंगल कारखान्याच्या एका कर्मचाऱ्याने लोकमंगल कारखान्याच्या अग्नीशामक गाडीला फोन करून बोलावून घेतले. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणली.
यावेळी लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन केंद्रे व पोलीस कर्मचारी कांतु राठोड यांनी काही मिनिटांत घटनास्थळी धाव घेवून घटनेची माहिती घेतली. या घटनेत सुदैवाने कुठलीच जीवित हानी झाली नाही. मात्र बसचा काही भाग जळालेला आहे. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी घटनास्थळी जमा झाली होती. वेळीच आग आटोक्यात आणली गेली नसती तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती.