दहा महिन्यांत केळीचे बंपर पीक
उगवणारा ‘सेंद्रीय बागायतदार’ सचिन ! माशेलात 15 हजार चौ.मिटर जागेत 2000 केळीची लागवड सेंद्रीय पद्धतीने,फोंडा कृषी खात्यालाही आश्चर्यचकीत करणारा संशोधात्मक शेतकरी
माशेल : शेतकऱ्याने स्वत: पिकवलेल्या मालाची निर्यात कशी होईल याचे नियोजन करीत शेती व्यवसायात उतरणाऱ्या प्रत्येक बळीराजाला आज उज्ज्वल भविष्य आहे. निव्वळ 100 टक्के सेंद्रीय खताचा वापर करून निच्चाकी दहा महिन्याच्या अवधीत केळीचे पिक काढून माशेल येथील सचिन प्रभाकर कामत सातोस्तर यांनी फोंड्याच्या कृषी खात्dयालाही आश्चर्यचकीत केले आहे. या प्रयोगामुळे आज त्यानी एक प्रशतशील बागायदार म्हणून नावलौकिक मिळवलेला आहे. गोमंतकीय शेतकऱ्यांनी स्वयंपुर्ण बनून आत्मनिर्भर व्हावे असा संदेश ते देत आहेत. कोरोना महामारीनंतर अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सातोस्कर यांनी सर्वकाही थांबलेल्या अवस्थेत असताना भरपूर वेळ मिळू लागल्याने आपल्या वडीलोपार्जित जागेतील बागायतीत लक्ष घालायला सुरूवात केली. आजच्या घडीला केवळ तीन वर्षात ते स्वत: स्वयपुर्ण आत्मनिर्भर शेतकरी बनले आहेतच मात्र आपल्यामुळे 4 जणांना रोजगार मिळत असल्यामुळे ते धन्यता मानत आहेत.
बागायत एकूण 20 हजार चौ मिटर मध्ये व्यापलेली आहे. त्यातून सुमारे 15 हजार चौमिटर जागा लागवडीखाली आणण्यात आलेली आहे. बागायतीत एकूण 3 विहीरी असा नैसर्गिक पाण्याचा स्रोत भरपूर आहे. ड्रिप लाईनसह सर्व बागायतीत पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. पुर्वी ही खडकाळ जमीत असून या जमिनीत पिक मिळणे कठीण अशी समजूत जाणकार व्यक्त करीत होते. 25 वर्षापुर्वी बागायतीच्या कामाची असलेल्या अवाडीमुळेच लहान पेट्रोलच्या दिव्याच्या उजेडात वाढलेल्या गवतात धाडसाने पाणी शिंपणी करीत आज हा डोलारा आपल्या जिद्दीने सचिनने उभारलेला आहे. पडीक जमिनीतून आज सातोस्कर स्वत:च्या हिमतीवर सुमारे एका हंगामात हजारो केळीचे सर्वात मोठ मोठे बंपर (केळीचे घड) पिक काढत आहे. यासाठी त्याचा फॉर्मुलाही वेगळा आहे. ते केळीची कलमे खास (टिश्यु कल्चर बनाना) यावर त्याचा विश्वास आहे.
केवळ दहा महिन्यात बारा किलो वजनाचा केळीच्या घडाचे उत्पादन
म्हैसूर येथील एका वैज्ञानिकाच्या मार्गदर्शनाखाली तयार पेलेली केळीची कमले ते आणतात. ही कलमे आणून ते माशेल येथील ग्रीन नेटमधील पोषक नैसर्गिक वातावरणात त्यांची निगा राखली. प्रत्येक आठ दिवसात त्याच्यावर सेंद्रीय जंतूनाशक फवारणी, दीड महिनाभर शेडमध्ये वाढविल्यानंतर त्यांना सुर्यप्रकाशात आणले जाते. त्यानंतर रोपाची ठरलेल्या जागी वाढ केली जाते. सुरक्षित 5 फुटाचे अंतर सोडून केळीची बागायत फुलविली.साधारण 10 महिन्यानंतर केळीचे पिक कापण्यासाठी तयार असते.ही प्रक्रिया व्यवस्थितरितया पार पडण्यासाठी विशेष काळजी घेतली जाते. केळीच्या घडाची शेंडी (बोणी) कापल्यानंतर त्याजागी जिवामृत गुंढाळून ठेवले जाते. याचे नेमके कारण असे की केळीच्या फळाला दोन्ही बाजूने म्हणजेच झाडाच्या मुळापासून तसेच कापलेल्या बोणीपासून पोषक तत्वे निरंतर मिळत राहते असे सुवर्णमध्य साधत असल्यामुळेच केळीचे झाड केवळ 10 महिन्यात पिक देत असल्याचे ते सांगतात. आज त्याच्या बागायतीत सुमारे चार प्रजातीच्या केळीची झाडे आहेत. त्यामध्ये तांबडी केळी, वेलची, नेन रन व केवढीज नाईन केळी अशी चार जातीसह सुमारे 2000 केळीची लागवड ते करीत आहे.
सेंद्रीय खत स्वत: तयार करण्यावर भर
आज सातोस्कर यांच्या बागायतीत सुमारे 100 माड असून दर तिमाहीला सुमारे 3000 नारळाचे पिक मिळत आहे. पुर्णत: सेंद्रीय खतावर सर्व बागायत फुलविलेली आहे. त्यासाठी त्यांनी विशेष मेहनतही घेतलेली आहे. 7 बॅचमध्ये आपल्या फार्मात गांडूळ खताची निर्मिती त्यांनी स्वत: केलेली आहे. लहानपणापासून ग्राफ्ट झाडाची आवड असल्यामुळे अनेक आंब्याच्या रोपटे तयार करण्यावर नेहमी भर राहिलेला आहे. छंद म्हणून सुरू केलेली ही आवड आज बऱ्यापैकी पिक देत असल्याचे ते सांगतात. माशेल येथे रस्त्याच्या कडेला बागायत वसलेली असल्यामुळे शेतीमालाचा विक्री करण्यासाठी कोणतीच धडपड करावी लागत नसून लोक शोधत बागायत गाठत असल्याचे ते सांगात.
सेद्रीय खतापासून निर्मित फळे कर्करोग्यासाठी उपायकारक
सेंद्रीय खताच्या वापरातून मिळणाऱ्या केळ्यांना बाजारात भरपूर मागणी आहे. एका आयुर्वेदीक डॉक्टरांनी आपल्याला संपर्क साधून कर्करोगाच्या रूग्णांना सेंद्रीय खतापासून पिकवलेली फळे अत्यंत उपयुक्त असल्याची माहिती दिले. ते डॉक्टर दर आठवड्याला बागायतीत भेट देत असतात. आठवडयातून दोनवेळा सुमारे 70 किलो केळी आपल्याकडून खरेदी करीत असल्याचे अभिमानाने सांगतात.
युवकांनो स्वयंपुर्ण, आत्मनिर्भर बना, पडीक जमीन लागवडीखाली आणा!
आज सातोस्कर यांनी आपल्या बागायतीचा विस्तार करण्याकडे बऱ्यापैकी भर दिलेला असून टॉमेटो, तेंडली, मिरची, वाल, हळद, आले सारखे हंगामी पिक तसेच उत्सवाच्या काळात झेंडूच्या फुलाची ते लागवड करीत आहे. त्याशिवाय हंगामी फळाच्या मोसमात आंबे, चिकू, केळी बंपर पिक काढून आपल्या कामगार वेतनाच्या नियोजनाची सुनिश्चित सोय त्यानी केलेली आहे. आज त्यांनी पोफळीच्या झाडे वाढविण्याभर भर दिलेला आहे. कारण मसाल्यात वापरात येणारी मिरी लागवडीसाठी पोफळीचे झाड असा दुहेरी उपयोग होत असतो. त्यामुळे 400 पोफळीच्या झाडांची लागवड पेलेली आहे. आजपर्यंत आपल्या बागायतीत भेट देणारा प्रत्येकजण आपला ग्राहक बनलेला आहे. त्यांनी सुचविलेले बदल व सुचना अंमलात आणीत आहेत शेतीविषयी नवनवीन संशोधनात्मक प्रक्रिया शिकण्याकडे कल राहिलेला आहे. ती प्रक्रिया शिकल्यावर प्रात्यक्षिके आपल्या बागायतीत करणे हा त्यांना छंद जडलेला आहे. शेतीविषयी नेहमी नवीन शिकण्यासाठी सतत उत्सूक असणाऱ्या सातोस्करासारखेच आजच्या युवकांनी स्वयंपुर्ण बनत आत्मनिर्भर होण्याची प्रेरणा घ्यावी !