सोमवारी शेअरबाजारात तेजीची झुळूक
निफ्टीने गाठली सर्वोच्च पातळी, ग्रासिमचा समभाग तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
सोमवारी शेअर बाजार चांगल्या तेजीसोबत बंद झालेला पाहायला मिळाला. महत्त्वाचे म्हणजे निफ्टी निर्देशांकाने 22157 अंकांची सर्वोच्च पातळी गाठली होती. सेन्सेक्स 281 अंकांसह तर निफ्टी 81 अंकांनी तेजीत राहिला. ग्रासिम इंडस्ट्रिजचा समभाग सोमवारी सर्वाधिक चमकला होता तर कोल इंडियाचा समभाग मात्र कमालीचा घसरणीत राहिला होता.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 281 अंकांनी वाढत 72,708 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 81 अंकांच्या तेजीसह 22,122 अंकांवर बंद झाला होता. कोल इंडियाचे समभाग 4 टक्के इतके घसरणीत राहिले होते तर लार्सन टुब्रोचे समभाग सुद्धा 1.4 टक्के इतके घसरणीसह बंद झाले होते. याविरुद्ध ग्रासिम इंडस्ट्रिजच्या समभागांनी 3 टक्के वाढीसह तेजी राखली होती तर बजाज फिनसर्व्हचे समभाग 2.81 टक्के वाढलेले पाहायला मिळाले. बजाज ऑटो, सिप्ला, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक आणि डॉक्टर रे•िज लॅब्ज यांनी तेजी राखत बाजाराला आधार दिला. दुसरीकडे कोल इंडिया, विप्रो, लार्सन टुब्रो, एलटीआय माइंट्री, एसबीआय लाइफ, एचडीएफसी लाइफ आणि हिरो मोटोकॉर्प यांनी मात्र गुंतवणूकदारांची घसरणीसह निराशा केली.
आठवड्यातील पहिल्या दिवशी भारतीय शेअरबाजारात राष्ट्रीय शेअरबाजाराने म्हणजेच निफ्टी निर्देशांकाने सर्वकालीक 22,157 अंकांची पातळी गाठण्यात यश मिळवले. याआधी निफ्टीने 22,115 अंकांची सर्वोच्च पातळी 15 जानेवारी रोजी गाठली होती. सेन्सेक्समधील 30 पैकी 25 समभाग तेजीत होते तर अन्य 5 मात्र नुकसानीत होते. याशिवाय शेअरबाजार सुरु होताच सकाळच्या सत्रात पेटीएमच्या समभागाला 5 टक्के अप्पर सर्किट लागले होते. कन्झ्युमर ड्युरेबलच्या निर्देशांकात 1.95 टक्के इतकी तेजी होती. निफ्टी रियल्टी वगळता इतर सर्व क्षेत्रांचे निर्देशांक तेजीचा कल राखून बंद झाले होते.