दुसऱ्या सत्रात बाजारात तेजीची झुळूक
सेन्सेक्स 31 अंकांनी तेजीत, निफ्टी 21,544 वर बंद
मुंबई :
भारतीय शेअर बाजारात चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांच्या निर्देशांकांनी तेजीची झुळूक प्राप्त करत आपला प्रवास थांबवला आहे. प्रारंभीच्या दरम्यान मंगळवारी बाजारात सकारात्मक तेजी दिसून आली. विक्रीच्या दबावात मात्र बाजाराच्या तेजीचा प्रवास काहीसा संथपणे राहिल्याचे दिसून आले.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 30.99 अंकांनी वधारुन निर्देशांक 71,386.21 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक अंतिमक्षणी 31.85 अंकांच्या तेजीसोबत 21,544.80 वर स्थिरावल्याचे दिसून आले.
ट्रेडिंगमधील आकडेवारीनुसार गुंतवणूकदारांनी कंपन्यांच्या तिमाही निकाल सादर होण्याअगोदर आणि चालू आठवड्यातील चलनदर तसेच अन्य महत्वपूर्ण आर्थिक आकडेवारी सादर होण्याच्या अगोदरच बाजारात मोठ्या प्रमाणात नफा वसुली केली असल्याने बाजारात तेजीची झुळूक राहिली होती.
मुख्य कंपन्यांमध्ये लार्सन अॅण्ड टुब्रो, भारती एअरटेल, एचसीएल टेक, टाटा मोर्ट्स, सनफार्मा आणि टाटा स्टील यांचे मुख्य समभाग हे वधारले आहेत. अन्य कंपन्यांची स्थिती पाहिल्यास यामध्ये नेस्ले इंडिया, एशियन पेन्ट्स, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक आणि अॅक्सिस बँक यांचे समभाग मात्र नुकसानीत राहिले आहेत.
जागतिक पातळीवरील स्थिती
आशियातील अन्य बाजारांमध्ये जपानचा निक्की आणि चीनचा शांघाय कम्पोझिट हे तेजीत राहिले तर दक्षिण कोरियाचा कोस्पी
आणि हाँगकाँगचा हँगसेंग हे नुकसानीत राहिले आहेत युरोपमधील मुख्य बाजारांची सुरुवात ही घसरणीत राहिली. अमेरिकन बाजार सोमवारी तेजीसह बंद झाला आहे. जागतिक बाजारात कच्चे तेल 1.72 टक्क्यांनी वधारुन 77.43 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे. शेअर बाजारातील आकडेवारीनुसार विदेशी गुंतवणूकदारांनी सोमवारी 16.03 कोटी रुपये मूल्याच्या समभागांची खरेदी केली आहे.