बुडबुडे निर्माण करणारा सरडा
नव्या संशोधनातून याचे कारण आले समोर
एका अनोख्या संशोधनात वैज्ञानिकांनी स्कूबा डायविंग करणारे सरडे पाण्यात बुडबुडे कशासाठी निर्माण करतात याचे कारण शोधून काढले आहे. अमेरिकन वैज्ञानिकांनी या नव्या संशोधनातून स्कूबा डायविंग करणारे सरडे पाण्यात श्वास घेणे आणि शिकाऱ्यांपासून वाचण्यासाठी बुडबुड्यांचा वापर करत असल्याचे शोधले ओ. या सरड्यांना जंगलाच्या चिकन नगेट्स म्हटले जाते.
वॉटर एनोल्स नावाची ही प्रजाती कोस्टा रिकाच्या उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये आढळून येणारा एकप्रकारचा अर्ध-जलीय सरडा आहे. हा स्वत:ची शिकार करणारे पक्षी आणि सापांपासून वाचण्यासाठी या अनोख्या तंत्रज्ञानाचा वापर करतो. न्यूयॉर्कच्या बिंगहॅमटन विद्यापीठाच्या डॉ. लिंडसे स्विएर्क यांनी प्रथम पाण्यात बुडबुड्यांचा वापर करत या प्रजातीची माहिती मिळविली होती.
सरड्यांना जेव्हा एखाद्या शिकारीपासून धोका जाणवतो, तेव्हा ते पाण्यात शिरतात आणि श्वास घेण्यासाठी स्वत:च्या डोक्यावर एक बुडबुडा तयार करतात. हा सरडा दीर्घकाळापर्यंत पाण्यात राहू शकतो असे लिंडसे यांनी सांगितले आहे. श्वसनात या बुडबुड्याची प्रत्यक्षात कुठलीही खास भूमिका होती की नाही हे त्यांना माहित नव्हते. बुडबुडे श्वसनात कुठलीही सक्रीय भूमिका बजावतात का केवळ हे एक बायप्रॉडक्ट आहे. तपासण्यासाठी लिंडसे यांनी सरड्यांच्या त्वचेच्या पृष्ठभागावर एक पदार्थ लावला जो बुडबुडे निर्माण होण्यापासून रोखतो.
हे सरडे किती बुडबुडे तयार करता आणि कितीवेळ पाण्यात राहू शकतात याची नोंद डॉ. स्विएर्क यांनी केली. त्यांची तुलना एका समुहाच्या सरड्यांशी करण्यात आली, ज्यांना सामान्य स्वरुपात श्वसन करण्याची अनुमती देण्यात आली होती. निष्कर्षांमधून नियंत्रण समुहाचे सरडे बुडबुडे तयार करण्यास त्रास सहन करणाऱ्या सरड्यांच्या तुलनेत 32 टक्के अधिक पाण्यात राहु शकतात हे दिसून आले.
बायोलॉजी लेटर्समध्ये प्रकाशित अध्ययनानुसार एनोल्स जंगलाच्या चिकन नगेट्सप्रमाणे आहेत. पक्षी त्यांना फस्त करतात, साप त्यांची शिकार करतो. याचमुळे पाण्यात उडी घेत ते अनेक शिकारींपासून वाचू शकतात आणि पाण्याखाली अत्यंत शांत राहू शकतात. धोका टळत नाही तोवर ते पाण्याखाली राहतात. कमीतकमी 20 मिनिटांपर्यंत ते पाण्याखाली राहू शकतात.