शालेय जलतरण स्पर्धा ते डेफ ऑलिम्पिक एक देदिप्यमान भरारी
मूकबधीर-कर्णबधीर सुबिया मुल्लाणीची यशोगाथा : आई-वडीलांनीही उचलले कष्ट, सुबियाच्या यशात भवानी जलतरण तलावाचा मोठा वाटा
सुबिया फक्त दोन वर्षाची होती. आई, वडील आणि घरचे सर्वजणच तिच्याशी लडीवाळ भाषेत संवाद साधत होते. परंतु सुबिया रिअॅक्ट करत नव्हती. असे बरेच दिवस सुरू होते. असे का होतयं म्हणून आई मिनाज मुल्लाणी व वडिल रहिमखान मुल्लाणी यांनी सुबियाला डॉक्टरांना दाखवले. डॉक्टरांनी तपासणी केली असता सुबिया ही जन्मजातच मूकबधिर व कर्णबधिर असल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी ही बाब सांगताच आई-वडिलांच्या पायाखालची वाळूच सरकली. परंतू म्हणतात ना देवाची करणी आणि नारळात पाणी त्यानुसार सूबियाच्या जीवनाने आकार घेतला. शालेय, महाविद्यालयीन शिक्षण घेत सुबिया ताकतवर जलतरणपटू तर बनली शिवाय तिने मनपास्तरीय, विभाग, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देदिप्यमान कामगिरी करत पदकांचा पाऊस पाडतानाच भारताच्या पटलावर किर्ती मिळवली. डेफ ऑलिम्पिकमध्येही भारतातर्फे पाच वेळा प्रतिनिधित्व करण्याचा पराक्रम केला. गतवर्षी ब्राझीलमध्ये झालेल्या डेफ ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधीत्व केल्याबद्दल पतपंध्रान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अन्य खेळाडूंसोबत सुबियाचाही गौरव करण्यात आला आहे.
कोल्हापुरातील मुकबधीर आणि कर्णबधीर सूबियाचा सुरुवातीचा काळ हा आई-वडिलांची परीक्षाच घेणारा होता. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आई-वडिलांनी सुबियाला वस्तूंची ओळख करून देण्यास सुरुवात केली. ते जी वस्तू सुबियाला दाखवायची, त्या वस्तूवर वस्तूच्या नावाची चिठ्ठी लावत होते. चिठ्ठीवरील नाव वाचून सुबिया संबंधीत वस्तू माहिती कऊन घेत होती. हातवारे करत सुबियाला सगळे काही शिकवले. यात सुबिया जशी जाणती झाली तसे घरातील चिंतेचा वातावरण आनंदात बदलले. शिवाजी पेठेतील एस. एम. लोहिया मूकबधिर हायस्कूलमध्ये तिला शिक्षणासाठी घातले. सुबिया वर्गात तर आई, वडिल हायस्कूलबाहेर थांबायचे. 3 वर्षे ही कसरत सुरू होती. सुबिया एखाद्या खेळात असावी म्हणून वडीलांनी तिला भवानी जलतरण तलावावर नेले. रोजच्या रोज पोहण्याच्या सराव ती मग्न झाली. तिचा पोहण्याचा वेग पाहून ज्येष्ठ प्रशिक्षक श्रीकांत जांभळे यांनी सुबियाला जलतरणातच कायम ठेवा, असा सल्ला आई-वडीलांना दिला. यावेळी ती तिसरीच्या वर्गात होती. पुढे जांभळे यांनी तिला ब्लॅकबोर्डवर जलतरणातील विविध प्रकारांचे आंतर व आंतर गाठण्यासाठी कसा सरावा करावा हे लिहून दाखवत पोहण्याचे धडे देण्यास सुरुवात केली. लोहिया मूकबधिर हायस्कूलमध्ये पाचवीच्या वर्गात शिकत असताना तिने शालेय जलतरण स्पर्धेत सहभागी होण्यास सुऊवात केली. परंतू पुढील तीन वर्षे स्पर्धेत अपयशच आले. असे घडूनही ना सुबिया खचून गेली, ना तिचे आई-वडील खचले. 2009 साल हे मात्र सुबियासाठी महत्वपूर्ण ठरले. सोलापुरात झालेल्या राज्यस्तरीय मुकबधीर जलतरण स्पर्धेत मागील तीन वर्षाच्या अपयशाचा वजावटा काढत 50 मीटर बॅकस्ट्रोक, ब्रेस्टस्ट्रोक, फ्रीस्टाइल, बटरफ्लाय, 100 मीटर बॅकस्ट्रोक व 200 मीटर आयएम या सहाही प्रकारात सहा सुवर्णपदके जिंकली.
भारतीय संघातून प्रथमच डेफ ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधीत्व
शालेय मनपास्तरीयपासून ते राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत यश मिळवत मिळवत सुबिया जागतिक पातळीरील स्पर्धेत सहभागी होऊ शकेल इतक्यात तयारीची जलतरपणपटू बनली. नागपूरात झालेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेतील जलतरणाच्या विविध प्रकारात 5 सुवर्ण पदके जिंकून बल्गेरियातील डेफ ऑलिंपिकमधील जलतरण स्पर्धेसाठी दिल्लीमध्ये आयोजित भारतीय संघ चाचणीत ती सहभागी झाली. चाचणीत काबीलियत सिद्ध करत तिने डेफ ऑलिम्पिकसाठी भारतीय संघात पहिल्यांदा स्थान मिळले. ऑलिम्पिकमधील जलतरण स्पर्धेत तिने प्रतिनिधित्व करत सहावा क्रमांक मिळवला. मात्र याचवेळी तिला बल्गेरियाला पाठवण्यासाठी आई-वडिलांवर आपल्याकडील सोने गहाण ठेवावे लागले होते. याच काळात वडीलांच्या पगारातून घरसंसार व सुबियाच्या खुराकावर कराव्या लागणाऱ्या खर्चाचा मेळही बसेनासा झाला होता. परंतू पोटाला चिमटा लावून सुबियावरील खर्च सुऊच ठेवला. त्यामुळेच 2012-13 साली झालेल्या शालेय जलतरण स्पर्धेत सुबिया गरुडझेप घेऊ शकली. स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलींच्या मनपास्तरीय, विभागीय स्पर्धेत सुवर्णपदके मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेत उडी घेतली होती. तसेच राज्यस्तरीय स्पर्धेतही 200 मीटर ब्रेस्टटोक व 400 मीटर आयएम प्रकारात सुवर्णपदक जिंकले.
सागरी स्पर्धेतही जोमदार कामगिरी...
एक वेगळी अचिव्हमेंट म्हणून वडीलांनी सुबियाला सागरी स्पर्धेत सहभागी करण्याचे ठरवले. त्यानुसार ती प्रशिक्षक श्रीकांत जांभळे यांच्याच मार्गदर्शनाखाली रोज तीन तास सराव कऊ लागली. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे स्वीम्याथॉन खुल्या सागरी स्पर्धेत प्रथमच प्रतिनिधित्व करत 10 किलोमीटर पोहणे या प्रकारात क्षमता दाखवून सुबियाने सुवर्णपदक जिंकले. पुढे मालवण-चिवला बीच, चेन्नई, रत्नागिरी भाटेबीच, पोरबंदर (गुजरात) भटकल (कर्नाटक) या पाचही ठिकाणीही झालेल्या खुल्या सागरी 10 किलो मीटर पोहणे स्पर्धांमध्ये सुबियाने तरबेज महिला जलतरणपटूंना मागे टाकत सुवर्णपदांवर कब्जा केला. तेव्हापासून आजतागायत म्हणजेच दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या सागरी 10 किलोमीटर जलतरण स्पर्धेत सुबियाने सुवर्णपदक जिंकण्याचा हेका सोडलेला नाही. इतकेच नव्हे तर 2021 व 23 या दरम्यान, मालपे ते विजयदुर्ग या सागरी 30 किलो मीटर जलतरण स्पर्धेतही सुवर्ण पदके जिंकण्याची हॅटट्रीक केली. सागरी स्पर्धेतील एकुणच कामगिरीवर देशाच्या जलतरण क्षेत्रामधील जाणकार खुष असणे ही सुबियाची जमेची बाजू आहे. 2017 साली बारावीचे शिक्षण घेताना शालेय जलतरण स्पर्धांमध्येही मनपास्तरीय, विभागीय, राज्य, राष्ट्रीय अशा चारही स्तरांवर सुवर्ण व रौप्य पदक पटकावले. याचवेळी तुर्कीत 2017 साली झालेल्या डेफ ऑलिम्पिकमधील जलतरण स्पर्धेसाठी दुसऱ्यांदा आपली काबिलियत सिद्ध भारतीय संघात स्थान मिळवले. ऑलिम्पिकमधील 200 मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये चौथा, 800 मीटर फ्रीस्टाईलमध्ये पाचवा व 200 मीटर आयएममध्ये सहावा क्रमांक मिळवला.
सुबियाने राजर्षी शाहू कॉलेजमध्ये कला विभागात शिकत असताना कोरोनाची महामारीमुळे होती. संसर्ग रोखण्यासाठी जलतरण तलाव बंद ठेवले होते. अशा परस्थितीतही सुबियाने भोगावती नदीत पोहण्याचा सराव आणि घरी वर्कआऊट केला. हा सराव 2021 ऑल इंडिया स्पोर्टस् कौन्सिल ऑफ डेफ या संस्थेने तैपई (चीन) येथे होणाऱ्या डेफ ऑलिम्पिकसाठी दिल्लीमध्ये आयोजित भारतीय संघ निवड चाचणीसाठी कामी आला. या चाचणीत तिने 200 मीटर ब्रेस्टस्टोक, 800 मीटर फ्रीस्टाइल आणि 400 मीटर आयएम व 200 मीटर बॅकस्ट्रोक या चारही प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत भारतीय संघात स्थान मिळवून तैपई ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधीत्व केले. परंतू यश मिळाले नाही. पुढील काळात पोलंड व ब्राझील डेफ ऑलिम्पिकमधील जलतरण स्पर्धेतही तिने भारतातर्फे प्रतिनिधित्व केले. त्यासाठी आयोजित चाचणीमध्ये सुबियाने सुवर्ण पदकाचा पाऊसच पाडला होता.
शिवाजी विद्यापीठातर्फे गौरव...
सुबियाने 2022, 2023 व 2024 साली विद्यापीठ पातळीवर झालेल्या विभागीय, आंतरविभागीय महाविद्यालयीन जलतरण स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व करत ब्रेस्टस्ट्रोक, बॅकस्ट्रोक, फ्रीस्टाईल, आयएम आणि बटरफ्लाय या पाचही पदकांचा पाऊस पाडत सलग तीन वर्षे भुवनेश्वर येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ जलतरण स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघात स्थान मिळवले होते. या स्पर्धांमध्ये पदके मिळवला आली नसली तरी तिने बेस्ट ऑफ एटमध्ये स्थान मिळवत खेलो इंडियाअंतर्गत ठिकठिकाणी झालेल्या जलतरण स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली होती. तिच्या या कामगिरीची दखल घेऊन शिवाजी विद्यापीठाने सुबियाला 2022, 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षासाठी प्रतिष्ठेची ट्रॉफी देऊन गौरवले आहे. या सगळ्या कामगिरीसाठी पिराजीराव घाटगे ट्रस्टचे विश्वस्त प्रवीणसिंह घाटगे, विरेंद्रसिंह घाटगे, यांच्यासह श्रीकांत जांभळे, श्रेणिक जांभळे, निलकंठ आखाडे, तेजस नायर, सतिश सोळंकी, अमर पाटील, पृथ्वीराज सरनाईक, भक्ती पाटील, मकरंद कुठरे व अवधुत पऊळे यांचे तिला कधीही न विसरता येणारे मार्गदर्शन लाभल्याचे सुबियाचे वडील रहिमखान मुल्लाणी यांनी सांगितले.
-संग्राम काटकर