भामट्या वधूकडून वरास गंडा
सांगली :
पहिले लग्न झालेले असताना एका विवाहितेने अन्य चौघांच्या मदतीने वरास दीड लाख रुपयांना गंडा घातला. याबाबत पाच जणांविरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कृष्णा सुभाष जाधव (वय 35, रा. पंचशीलनगर, मंडगुळे प्लॉट झोपडपट्टी, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्यामध्ये पलवी मंदार कदम (मूळ नाव : परवीन मोदीन मुजावर. रा. रेल्वे स्टेशन झोपडपट्टी, गांधीनगर, कोल्हापूर), एजंट - राणी कुंभार (पूर्ण नाव माहित नाही, रा. पंचशीलनगर), राधिका लोंढे (रा. मिरज), सुमन वाघमारे (रा. मिरज) आणि नाईक बाई (पूर्ण नाव माहित नाही, रा. कलानगर, सांगली) यांचा समावेश आहे. ही फसवणूकीची घटना 9 सप्टेंबर ते 8 डिसेंबर या कालावधीत घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी कृष्णा जाधव हा खाजगी नोकरी करतो. संशयित पाच जणांनी संगनमत करुन परवीन मुजावर हिचे पहिले लग्न झालेले असताना देखील फिर्यादी कृष्णा समवेत तिचे दुसरे लग्न लावून दिले. याकरिता फिर्यादीकडून दीड लाख रुपये घेतले. ही बाब काही दिवसांनी फिर्यादी कृष्णा जाधव यांना समजली. वास्तविक संशयित पलवी उर्फ परवीन हिचे पहिले लग्न मंदार कदम याच्यासमवेत झाले होते. मात्र ही बाब संशयितांनी फिर्यादी कृष्णा जाधव याच्यापासून लपवून ठेवली. परवीन ही मुस्लिम धर्माची असून देखील पलवी कदम या नावाने स्वत:ची ओळख लपविली आहे. पोलिसांनी फिर्याद दाखल होताच संशयित पलवी कदम आणि एजंट राणी कुंभार यांना अटक केली आहे. या प्रकाराने पोलीसही चक्रावले आहेत.