सलग चार दिवसांच्या बाजारातील घसरणीला ब्रेक
सेन्सेक्स 382 अंकांनी चमकला, निफ्टी 100 अंकांनी तेजीत, ऑटो निर्देशांक तेजीवर स्वार
सलग चार सत्रांमध्ये घसरणीत असलेल्या भारतीय शेअर बाजारासाठी मंगळवार हा तेजी मिळवून देणारा राहिला. ऑटो व आयटी या दोन निर्देशांकांनी भारतीय शेअर बाजाराला तेजी मिळवून देण्यात पुढाकार घेतला.
वृत्तसंस्था, मुंबई
मंगळवारी आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 382 अंकांनी वाढत 74649 अंकांवर बंद झाला. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 100 अंकांनी वाढत 23483 च्या स्तरावर बंद झाला. सोमवारी भारतीय शेअर बाजार नकारात्मक कामगिरी करत बंद झाला होता. मंगळवारी आयटी कंपन्यांच्या समभागांच्या तेजीमुळे शेअर बाजाराला आधार मिळाला. टीसीएसचा समभाग 6 टक्के इतका वाढीसोबत तर इन्फोसिसचा समभाग 5.35 टक्के वाढत व्यवहार करत होता. एचसीएलटेक 4.18 टक्के आणि अदानी पोर्ट 1.84 टक्के वाढत व्यवहार करत होता. सेन्सेक्समधील 30 पैकी 21 समभाग मजबूत होत बंद झाले. यामध्ये एनटीपीसी, पॉवर ग्रीड कॉर्प, आयसीआयसीआय बँक यांचे समभाग नुकसानीसोबत बंद झाले.
समभागांची कामगिरी
टीसीएस, इन्फोसिस, आयटीसी, अदानी एंटरप्रायजेस, ट्रेंट, टायटन, टाटा कंझ्युमर, टाटा मोटर पीव्ही, हिंडाल्को, नेस्ले इंडिया, बीईएल, टाटा स्टील, कोटक महिंद्रा बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, टेक महिंद्रा, जीओ फायनान्स, विप्रो, ओएनजीसी, आयशर मोटर, इंडिगो, एसबीआय आणि भारती एअरटेल यांचे समभाग तेजीसमवेत बंद झाले. दुसरीकडे कोल इंडिया, ग्रासीम, अपोलो हॉस्पिटल, लार्सन टूब्रो, सन फार्मा, सिप्ला, रिलायन्स, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व, श्रीराम फायनान्स, बजाज ऑटो, एनटीपीसी, डॉ. रे•ाrज लॅब्ज यांचे समभाग कमकुवत होत बंद झाले. मिडकॅपमध्ये बीएसई लिमीटेड, वन 97 (पेटीएम), बायकॉन, आयजीएल, फोनिक्स मिल यांचे समभाग घसरणीत होते.
विविध क्षेत्राच्या निर्देशांकांची कामगिरी
विविध निर्देशांकांची कामगिरी पाहता घसरणीत असणारे निर्देशांक अधिक होते. तेजीमध्ये ऑटो निर्देशांक 187 अंकांच्या वाढीसोबत 26079 अंकांवर तर आयटी निर्देशांक 1262 अंकांनी दमदार तेजीसोबत 31116 अंकांवर बंद झाला. एफएमसीजी, मेटल व रियल्टी यांचे निर्देशांकही तेजी राखत बंद झाले. घसरणीत कमोडीटीज, फायनान्सीयल, सीपीएसई, एनर्जी, इंट्रा, ऑईल अँड गॅस व फार्मा यांचे निर्देशांक कमकुवत कामगिरी करत बंद झाले.
