हैदराबादमध्ये मंदिरानजीक बाँबस्फोट
वृत्तसंस्था / हैदराबाद
तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथील एका मंदिराच्या नजीक झालेल्या स्फोटाने खळबळ उडाली आहे. मंदिरानजीक ठेवलेल्या बाँबचा स्फोट झाल्याने काही काळ या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या स्फोटात मंदिराचे पुजारी जखमी झाले आहेत. बाँब मंदिरानजीकच्या मार्गावरील कचरा कुंडात लपविण्यात आला होता, असे प्राथमिक तपासात आढळले आहे. या प्रकरणी चौकशीचा आदेश देण्यात आला असून बाँबमध्ये असलेल्या स्फोटकांचीही चाचणी करण्यात येत आहे.
हा एक सौम्य स्फोट होता. तथापि, पोलिस त्याची सखोल आणि सविस्तर चौकशी करणार आहेत. या घटनेचे अन्वेषण करताना कोणतीही शक्यता दुर्लक्षिली जाणार नाही. प्राथमिक तपासात हा स्फोट घातपाताचा प्रकार नाही, असे आढळून आलेले आहे. मात्र, ही शक्यताही गृहित धरुन तपास केला जाईल, असे हैदराबादच्या पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. स्फोटासाठी उपयोगात आणल्या गेलेल्या स्फोटकाचे नमुने संकलीत करण्यात आले असून सखोल तपासणीअंती सर्व माहिती हाती लागणार आहे, हैदराबादचे अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक राजेंदर नागर यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी त्वरित कारवाईला प्रारंभ केला आहे. जनतेने शांतता पाळावी आणि कोणीही या घटनेला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करु नये. हा स्फोट ज्यांनी घडविला त्यांना कठोर शिक्षा मिळेल असे स्पष्ट करण्यात आले.