For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बळ्ळारीतील लोकप्रतिनिधींना दणका

06:58 AM Jun 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
बळ्ळारीतील लोकप्रतिनिधींना दणका
Advertisement

काँग्रेसचे खासदार ई. तुकाराम ईडीच्या ताब्यात : माजी मंत्री बी. नागेंद्र यांच्यासह चार आमदारांवरही छापे

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

महर्षि वाल्मिकी विकास निगमच्या अनुदानाचा वापर बळ्ळारी लोकसभा निवडणुकीसाठी वापरल्याच्या आरोपप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी सकाळी बळ्ळारीचे काँग्रेसचे खासदार ई. तुकाराम यांना ताब्यात घेतले. तसेच बळ्ळारी शहरचे आमदार नारा भरत रे•ाr, कंप्लीचे आमदार जे. एन. गणेश, कुडिलगीचे आमदार डॉ. एन. टी. श्रीनिवास, बळ्ळारी ग्रामीणचे आमदार बी. नागेंद्र व त्यांचे स्वीय साहाय्यक गोवर्धन यांच्या निवासस्थानांवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले आहेत.

Advertisement

बळ्ळारी लोकसभा निवडणुकीवेळी 21 कोटी रुपये खर्च केल्याच्या आरोपावरून खासदार ई. तुकाराम यांच्या निवासस्थानांसह कार्यालयांवर ईडीच्या पथकाने छापे टाकले. पीएमएलए कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. ईडीच्या एकूण 60 अधिकाऱ्यांनी बळ्ळारी जिल्हा आणि बेंगळूरमध्ये चार आमदार व एका खासदारांची निवासस्थाने, कार्यालयांची झडती घेतली. बळ्ळारीत पाच व बेंगळूर शहारात तीन ठिकाणी असे एकूण 8 ठिकाणी तपासणी करण्यात आली.

वाल्मिकी विकास निगममधील सुमारे 21 कोटी रु. बळ्ळारी शहर, बळ्ळारी ग्रामीण, संडूर, कंप्ली आणि कुडिलगी विधानसभा मतदारसंघांतील मतदारांना वाटप केल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे ईडीच्या 60 अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या आठ पथकांनी बुधवारी छापेमारी केली. कारवाईवेळी अनेक महत्वाची कागदपत्रे, लॅपटॉप, मोबाईल, बँक व्यवहारांच्या तपशिलाची माहिती पडताळण्यात आली.

वाल्मिकी निगममधील अनुदानाच्या दुरुपयोग प्रकरणी यापूर्वी बी. नागेंद्र यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांची ईडीने चौकशी केली होती. त्यावेळी मिळालेल्या माहितीच्या आधारे बुधवारी दुसऱ्या टप्प्यात छापे टाकण्यात आले. काही कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली असून बँक खात्यांमधून झालेला व्यवहार, लोकप्रतिनिधींच्या निकटवर्तीयांच्या खात्यातील व्यवहाराचीही माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी पडताळली आहे.

माजी मंत्री बी. नागेंद्र यांचे बळ्ळारी ग्रामीण मतदारसंघातील कार्यालय, निवासस्थानीही झडती घेण्यात आल्याचे समजते. कोडिलगीचे आमदार डॉ. श्रीनिवास यांचे मूळ गाव नरसिंहगिरी येथील निवास्थानीही धाड टाकून तपासणी करण्यात आली. दोन कारमधून ईडीचे चार अधिकारी व चार सुरक्षा कर्मचाऱ्यांनी श्रीानवास यांच्या निवासस्थानी झडती घेतली. कारवाईवेळी श्रीनिवास घरी नव्हते. त्यांची आई घरात होत्या.

काय आहे प्रकरण?

वाल्मिकी विकास निगमधील अनुदानाचा दुरुपयोग झाल्याचे प्रकरण 2024 मध्ये उघडकीस आले होते. निगमचे लेखा अधीक्षक चंद्रशेखरन पी. यांनी वाल्मिकी विकास निगममधील अनुदानाचा दुरुपयोग झाल्याचा आरोप करत 26 मे 2024 रोजी सुसाईड नोट लिहून गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून शिमोग्यातील विनोबानगर पोलीस स्थानकात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच निगममधील अनुदान बँकेमार्फत अन्यत्र वळविण्यात आल्याच्या आरोपावरून बँक अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे बेंगळूरच्या हायग्राऊंड पोलीस स्थानकात फौजदारी गुन्हा दाखल झाला होता. सरकारने हे प्रकरण एसआयटीकडे सोपविले होते. तपास करून एसआयटीने आमदार बी. नागेंद्र यांचा या प्रकरणात सहभाग नाही, असा अहवाल दिला. मात्र, अनुदानाच्या रकमेचे बेकायदा हस्तांतरण प्रकरण परराज्याशीही संबंधित असल्याने सीबीआयने गुन्हा नोंदविला. दरम्यान ईडीनेही तपास हाती घेतला होता.

...तर कारवाईला आक्षेप नाही !

ईडीच्या छाप्यावेळी कायद्याचे उल्लंघन झाल्यास कारवाईचे मी समर्थन करणार नाही. कायद्यानुसार कारवाई करावी, त्याला माझा आक्षेप नाही.

- सिद्धरामय्या, मुख्यमंत्री 

मल्लिकार्जुन खर्गेंचा ईडीवर आरोप

काँग्रेसचे खासदार आणि आमदारांना लक्ष्य बनवून ईडीमार्फत छापे टाकण्यात येत आहेत, असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांना काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींबद्दल सुरुवातीपासून राग आहे. छाप्याद्वारे काँग्रेसला त्रास दिल्यास पक्षात दुफळी निर्माण होईल, हा ईडीचा हेतू आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Advertisement
Tags :

.