सौदी अरेबियाकडून पाकिस्तानला झटका
पाकिस्तानी पंतप्रधानांकडून काश्मीरचा मुद्दा उपस्थित : द्विपक्षीय चर्चेत वाद सोडविण्याचा सल्ला
वृत्तसंस्था/ रियाध
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्याशी काश्मीर मुद्द्यावर चर्चा केली आहे. शाहबाज हे 3 दिवसांच्या सौदी अरेबिया दौऱ्यावर होते. या चर्चेवेळी त्यांच्यासोबत अनेक मंत्री आणि पाकिस्तान-पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज देखील उपस्थित होत्या. बैठकीनंतर दोन्ही देशांकडून जारी करण्यात आल्याने संयुक्त वक्तव्यात भारत आणि पाकिस्तानने हा मुद्दा चर्चेद्वारे निकाली काढण्याची गरज असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सौदी अरेबियाची ही भूमिका पाकिस्तानसाठी झटका असल्याचे मानले जात आहे.
चर्चेद्वारेच क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य येऊ शकते असे सौदी अरेबियाकडून म्हटले गेले आहे. एकप्रकारे सौदी अरेबियात या प्रकरणी आपण अधिक लक्ष घालणार नसल्याचे पाकिस्तानसमोर स्पष्ट केल्याचे मानले जात आहे.
पाकिस्तानात फेब्रुवारी महिन्यात झालेल्या निवडणुकीनंतर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा हा पहिलाच विदेश दौरा होता. सौदी अरेबियाच्या युवराजांनी रमजानच्या काळात त्यांना इफ्तार पार्टीचे निमंत्रण दिले होते. या इफ्तार पार्टीत बहारिनचे पंतप्रधान आणि युवराज सलमान बिन हमद बिन अल खलिफा देखील सामील झाले आहेत.
शाहबाज यांनी सौदी युवराजांना पाकिस्तान दौऱ्याचे निमंत्रण दिले असून ते त्यांनी मान्य केले आहे. परंतु हा दौरा कधी होणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसेच सलमान यांनी पाकिस्तानसाठी 5 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची प्रक्रिया लवकर सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. पाकिस्तानने सौदी अरेबियाकडे कर्जाची मागणी केली होती. परंतु सौदी अरेबियाने या मागणीकडे दुर्लक्ष करत गुंतवणूक करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
सौदीकडून भारताला महत्त्व
सौदी अरेबिया मागील काही काळापासून भारतासोबतचे संबंध वृद्धींगत करण्यावर भर देत आहे. यादरम्यान काश्मीर मुद्द्यावर सौदीने अनेकदा पाकिस्तानची बाजू घेणे टाळले आहे. 2019 मध्ये काश्मीरमधून कलम 3710 हद्दपार करण्याचा निर्णय घेतल्यावर सौदी अरेबियाने घेतलेली भूमिका महत्त्वाची ठरली होती. सौदी अरेबियाने भारताच्या निर्णयावर टीका करणे टाळले होते. तसेच हा भारताचा अंतर्गत विषय असल्याची भूमिका मांडली होती.