सरकारी नोकर-आयकर भरणाऱ्यांना दणका
अन्न-नागरी पुरवठा खात्याची कारवाई : स्वत:हून बीपीएल रेशनकार्डे जमा करण्याचे आवाहन
बेळगाव : सधन रेशनकार्डधारकांनी स्वत:हून रेशनकार्डे जमा करावीत, असे आवाहन करूनही लाभार्थ्यांनी रेशनकार्डे जमा केली नाहीत. अशा लाभार्थ्यांना दणका बसला आहे. आर्थिकदृष्ट्या सधन असलेल्या लाभार्थ्यांना अन्न व नागरी पुरवठा खात्यामार्फत नोटिसा धाडण्यात आल्या आहेत. शिवाय याबाबत चौकशीही केली जात आहे. बीपीएल कार्डे एपीएलमध्ये बदलली जात आहेत. सरकारी नोकर, कर भरणाऱ्या लाभार्थ्यांनी स्वत:हून बीपीएल कार्डे जमा करावीत, असे आवाहनही खात्याने केले आहे. दारिद्र्या रेषेखालील लाभार्थ्यांना बीपीएल कार्डाचे वितरण केले जाते.
मात्र, शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी काहींनी खोटी कागदपत्रे पुरवून बीपीएल कार्डे मिळविली आहेत. अशांना खात्यामार्फत कार्डे जमा करण्यासाठी नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये खळबळ माजली आहे. पॅनकार्डच्या आधारे घेण्यात आलेल्या सर्वेक्षण मोहिमेमध्ये शहरात 76 जण कर भरणारे सापडले आहेत. तर 30 जणांनी सरकारी नोकर असूनही बीपीएल कार्डे घेतली आहेत. तर एकूण 901 जणांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. सरकारी नोकर, आयकर भरणारे, चारचाकी वाहन असलेले, शहरात एक हजार चौरस फुटापेक्षा मोठे घर असलेल्यांवर कारवाई केली जात आहे. बेकायदेशीर कार्डधारकांचा शोध घेऊन नोटीस पाठवली जात आहे. शिवाय नोटीस पाठविलेल्या लाभार्थ्यांनी अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या कार्यालयाकडे येऊन बीपीएलचे एपीएल कार्ड करून घ्यावे, असे आवाहनही केले आहे.
बीपीएल कार्डच्या संख्येत वाढ
गतवर्षीपासून राज्य सरकारने लागू केलेल्या गॅरंटी योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेकांनी बीपीएल कार्डे मिळविली आहेत. त्यांना आता दणका बसला आहे. अनेक जण आयकर भरणारे आहेत. अशांसमोर अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे बहुतांशी बीपीएल कार्डे रद्द होणार आहेत.
शहरातील 901 जणांना पहिल्या दिवशी नोटिसा
सरकारी नोकर, आयकर भरणाऱ्या शहरातील 901 जणांना पहिल्या दिवशी नोटिसा देण्यात आल्या आहेत. अशांनी अन्न व नागरी पुरवठा खात्याकडे येऊन आपली रेशनकार्डे एपीएल करून घ्यावीत, अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. पॅनकार्डच्या आधारे बेकायदेशीर कार्डधारकांचा शोध घेतला जात आहे.
- नजीर अहमद कनवळी (साहाय्यक निर्देशक)