For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रद्धेला धक्का...

06:35 AM Jun 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
श्रद्धेला धक्का
Advertisement

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही; ते कोट्यावधी भारतीयांच्या श्रद्धेचे, संघर्षाचे आणि सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक आहे. शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर उभे राहिलेले हे मंदिर देशभरातील रामभक्तांच्या भावविश्वाचा केंद्रबिंदू बनले आहे. अशा मंदिरातील देणगीपेट्यांमधील कथित गैरव्यवहार, चोरी, एफआयआर, अटक आणि चौकशीच्या बातम्या समोर येणे ही केवळ आर्थिक अनियमिततेची बाब नाही; ती लाखो-कोट्यावधी भक्तांच्या श्रद्धेला बसलेला गंभीर धक्का आहे. दानपेटीत टाकलेला प्रत्येक रुपया हा केवळ पैसा नसतो. तो भक्ताच्या विश्वासाचे, समर्पणाचे आणि भावनेचे प्रतीक असतो. अनेकजण आपल्या कष्टाची कमाई देवाच्या चरणी अर्पण करतात. त्या देणगीचा वापर मंदिराच्या सेवेसाठी, व्यवस्थापनासाठी आणि धर्मकार्यांसाठी होईल, या विश्वासातून ते अर्पण केले जाते. जर त्याच निधीवर डल्ला मारल्याचा आरोप होत असेल, तर तो गुन्हा केवळ कायद्याविरुद्ध नसून श्रद्धेविरुद्धही आहे. या प्रकरणात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. चोरी, विश्वासघात, फसवणूक आणि गुन्हेगारी कट यांसारख्या गंभीर कलमांखाली तपास सुरू आहे. काही आरोपींकडून रोख रक्कम जप्त झाल्याच्या आणि देणगीच्या पैशांतून मालमत्ता खरेदी केल्याच्या आरोपांमुळे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. त्याचवेळी ट्रस्टमधील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, एसआयटीची स्थापना आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. सध्या या प्रकरणात मंदिराच्या व्यवस्थापनावर सर्वोच्च न्यायालय आणि केंद्राने जाहीर केलेल्या अधिकारी मंडळींवर आरोप झाले आहेत, तपास सुरू आहे आणि न्यायालयीन प्रक्रिया बाकी आहे. त्यामुळे कोणालाही अंतिमत: दोषी ठरविण्याचा अधिकार केवळ न्यायव्यवस्थेलाच आहे. पण, मंदिरातील रकमेची चोरी करताना पकडलेले लोक त्यांचे नातेवाईक असणे आणि कोणतीही प्रक्रिया पार न पडता त्यांना नेमले जाणे, त्यांच्या घरी, तबेल्यात नोटांचे बंडल जप्त होणे हे गंभीरच आहे. इतके गंभीर आरोप समोर आल्यानंतर केवळ स्पष्टीकरण देऊन किंवा राजकीय प्रतिक्रिया देऊन जनतेचा विश्वास परत मिळणार नाही. वेळेत चौकशी आणि कितीही मोठी व्यक्ती असेल तर त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. सध्या या प्रकरणात एका बाजूला सरकार भ्रष्टाचाराविरुद्ध शून्य सहिष्णुतेचा दावा करत आहे, तर दुसऱ्या बाजूला विरोधक सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी करत आहेत. आता चौकशीत रामभक्तांचा विश्वास हरवू नये, याची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण हा विषय कोणत्याही पक्षाचा नसून संपूर्ण समाजाच्या श्रद्धेचा आहे. देशातील प्रत्येक मोठ्या धार्मिक संस्थेने आर्थिक व्यवहारांमध्ये सर्वोच्च पारदर्शकता ठेवली पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सीसीटीव्ही देखरेख, डिजिटल लेखापरीक्षण, स्वतंत्र ऑडिट आणि नियमित सार्वजनिक अहवाल यामुळे अशा घटनांना आळा बसू शकतो. पण अपहार समोर आला तर कारवाई झाल्याचे स्पष्टपणे दिसले पाहिजे, ती कारवाई ही यंत्रे करू शकत नाहीत त्यासाठी व्यवस्थेने कठोर असणे आणि प्रसंगी स्वत:मध्ये लपलेल्या गुन्हेगारांना शासन देताना डळमळीत न होणे अपेक्षित असते. श्रद्धा ही आंधळी नसते; ती विश्वासावर उभी असते आणि विश्वास टिकवण्यासाठी उत्तरदायित्व आवश्यक असते. श्रीराम हे भारतीय संस्कृतीत मर्यादा, प्रामाणिकपणा आणि धर्माचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या नावाने उभारलेल्या मंदिरातच गैरव्यवहाराचे आरोप होणे ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. व्यक्ती कोणतीही असो, संस्था कितीही मोठी असो किंवा तिची धार्मिक प्रतिष्ठा कितीही उंच असो कायद्यापुढे सर्व समान आहेत. राम मंदिर हे राष्ट्राच्या श्रद्धेचे केंद्र आहे. त्या श्रद्धेवर संशयाची सावली पडू नये, हीच प्रत्येक रामभक्ताची अपेक्षा आहे. या प्रकरणाचा निकाल केवळ काही आरोपींचे भविष्य ठरवणार नाही, तर धार्मिक संस्थांवरील जनतेचा विश्वास किती दृढ राहील, हेही ठरवणार आहे. म्हणूनच या प्रकरणात सत्य समोर येणे, दोषींना शिक्षा होणे हेच रामराज्याच्या संकल्पनेला साजेसे ठरेल. कारण मंदिराचे वैभव दगडांनी नव्हे, तर भक्तांच्या विश्वासाने उभे असते आणि त्या विश्वासाला धक्का बसणे हीच या संपूर्ण प्रकरणातील सर्वांत मोठी शोकांतिका आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.