अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याला धक्का
इराणने पाडली दोन लढाऊ विमाने : दोन हेलिकॉप्टर्सचीही हानी : हल्ल्यांना रोखठोक प्रत्युत्तर
वृत्तसंस्था/ तेहरान/वॉशिंग्टन
अमेरिकेने गेल्या 24 तासांत दोन लढाऊ विमाने आणि दोन हेलिकॉप्टर गमावली आहेत. एफ-15 लढाऊ विमानाचा पायलट अजूनही बेपत्ता आहे. त्याला शोधण्यासाठी इराणमध्ये बचावकार्य सुरू आहे. रात्रभर डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये आपल्या अधिकाऱ्यांसोबत युद्धाचा आढावा घेतला. ट्रम्प यांना इराणसोबतचे युद्ध खूपच सोपे वाटत होते, पण ते आता खूपच कठीण सिद्ध होत आहे. इराणने आतापर्यंत अमेरिकेची दोन एफ-35 स्टेल्थ लढाऊ विमाने पाडली आहेत. तसेच एक अवाक्स विमानही नष्ट केले. या संघर्षातच गेल्या 24 तासांत दोन लढाऊ विमाने पाडल्याने अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याला मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे.
इराणने अमेरिकेची दोन लढाऊ विमाने, एक एफ-15 आणि एक ए-10, पाडली आहेत. हा हल्ला अमेरिकेसाठी अत्यंत दुर्मीळ असून, गेल्या 20 वर्षांत असा हल्ला झालेला नाही. अमेरिकेतून आलेल्या अनेक वृत्तांनुसार, एफ-15 लढाऊ विमान पाडल्यानंतर आणि वैमानिक बेपत्ता झाल्यानंतर ट्रम्प संघर्ष वाढवू शकतात. युद्धविराम होण्याची शक्यता कमी दिसते. ट्रम्प यांनी लढाऊ विमान पाडल्याने सुरू असलेल्या युद्धविराम चर्चेवर परिणाम होणार नाही असे म्हटले असले तरी तरी गेल्या 24 तासांतील घटनांनी इराणमधील वर्चस्वाचा अमेरिकी हवाई दलाचा दावा खोटा ठरवला आहे.
अमेरिकेने केलेल्या हल्ल्याने इराणचे सैन्य पूर्णपणे नष्ट झाल्याचा ट्रम्प यांचा दावा खोटा ठरताना दिसत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला इराणची क्षेपणास्त्रs आणि ड्रोन प्रक्षेपित करण्याची क्षमता लक्षणीयरित्या कमी झाली असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटले होते. ट्रम्प यांच्या दाव्यानंतर इराणने केलेली ही मोठी कारवाई इराणी सैन्याची सामर्थ्यशाली शक्ती अधोरेखित करते. इराणमध्ये अमेरिकेचे लढाऊ विमान पाडल्याने दोन्ही देशांमधील वाटाघाटींवर परिणाम होणार नसल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. ‘आपण युद्धात आहोत,’ असे ट्रम्प यांनी अमेरिकन माध्यम एनबीसीला दिलेल्या फोन मुलाखतीत सांगितले.
अमेरिकन अधिकाऱ्यांकडून दुजोरा
इराणने शुक्रवारी एक एफ-15ई विमान पाडल्याच्या वृत्ताला अमेरिकन अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. लढाऊ विमानातील एका वैमानिकाला वाचवण्यात आले, तर दुसरा वैमानिक अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध लागलेला नाही. याचदरम्यान इराणी हवाई दलाने केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे एक ए-10 लढाऊ विमान कोसळले, असे वृत्त इराणी सरकारी माध्यमांनी दिले आहे.
...यापूर्वी 2003 मध्ये अशी शेवटची घटना !
अमेरिकन लढाऊ विमान पाडल्याची शेवटची घटना 2003 मध्ये घडली होती. इराक युद्धादरम्यान एका ए-10 थंडरबोल्ट विमानाला लक्ष्य करण्यात आले होते. निवृत्त हवाई दल ब्रिगेडियर जनरल ह्यूस्टन कॅन्टवेल यांच्या मते, अलिकडच्या दशकांमध्ये ही एक दुर्मीळ घटना आहे. अमेरिकन सैन्याने यापूर्वी प्रगत विमानविरोधी प्रणाली नसतानाही बहुतेकवेळा शत्रूंशी लढा दिला आहे. मात्र, आता इराणने अमेरिकन लढाऊ विमान पाडणे हे चमत्कारापेक्षा कमी नसल्याचा दावा करण्यात येत आहे.
इराणने कसा केला हल्ला?
इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) प्रसिद्ध केलेल्या फुटेजमध्ये अमेरिकन लढाऊ विमानांना जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केले जात असल्याचे दिसत आहे. हे पारंपरिक रडार-आधारित ट्रॅकिंगऐवजी ऑप्टिकल आणि इन्फ्रारेड (आयआर) सेन्सर्सद्वारे टिपले गेले असल्याचे दिसते.
वैमानिकाला पकडण्यासाठी 55 लाख रुपयांचे बक्षीस
इराणने अमेरिकन लढाऊ विमान वैमानिकाला पकडण्यासाठी 10 अब्ज इराणी तोमान (अंदाजे 55 लाख रुपये) बक्षीस जाहीर केले आहे. इराणच्या सरकारी माध्यम आयआरआयबीच्या एका निवेदकाने नागरिकांना अमेरिकन वैमानिकाला जिवंत पकडून सरकारी अधिकाऱ्यांच्या किंवा लष्कराच्या ताब्यात देण्याचे आवाहन केले आहे.