राजकीय वैराचा रक्तरंजीत शेवट !
संतांची पावनभूमी असलेल्या महाराष्ट्रात सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी खुलेआम मुडदे पडले आहेत. याला इतिहास साक्षीदार आहे. या हत्या कोणी घडवून आणल्या हे सर्व जगाला माहीत आहे. मात्र न्यायालयात लागतात ते सबळ पुरावे आणि खमके साक्षीदार. हे असतील तरंच खऱ्या आरोपींना शिक्षा ठोठावली जाते. अन्यथा राजकारणातील वैराचा रक्तरंजीत शेवट न्यायापर्यंत कधी जातच नाही.
शिवसेनेच्या शिंदे गटात जाहीर प्रवेश केलेले धाराशीवचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना गेल्या 20 वर्षात अद्याप न्याय मिळाला नाही. लोकप्रतिनिधी असून देखील वडिलांच्या मारेकऱ्यांना ते शिक्षा देऊ शकले नाहीत की खरे मारेकरी शोधू शकले नाहीत. यामध्ये चुक नेमकी कोणाची? हत्येचा तपास करणाऱ्या तपास यंत्रणांची की वडिलांच्या मारेकऱ्यांना अद्याप पकडू न शकलेल्या किंवा खऱ्या मारेकऱ्यांना माहीत असून देखील शिक्षेपर्यंत न पोहचवू शकलेल्या ओमराजे निंबाळकरांची? वडील पवनराजे निंबाळकर आणि त्यांचा वाहन चालक समध काझी यांची 3 जून 2006 रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथे दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार डॉ. पद्मसिंह पाटील हे पवनराजे निंबाळकर यांचे चुलतभाऊ त्यांनीच राजकीय वैमनस्यातून हत्या केल्याचा आरोप ओमराजे यांच्या कुटुंबियांनी केला. मात्र न्यायालयात सिद्ध न झाल्याने पद्मसिंह पाटील यांची निर्दोष मुक्तता झाली. राजकीय वैरभावातून रक्तरंजीत शेवट झालेले राज्यातील हे एकच प्रकरण नाही. राज्यात राजकीय वैरभावातून रक्तरंजीत शेवट झालेली अनेक प्रकरणे अशी आहेत की अद्याप यातील अनेकांना न्याय मिळाला नाही.
ओमराजे निंबाळकरांना येथे न्याय मिळाला नाही म्हणून त्यांनी वरील न्यायालयात न्याय मागण्यासाठी प्रयत्न करण्यास सुऊवात केली आहे. ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येला 20 वर्षे उलटली आहेत. जुन्या जाणत्या नागरिकांना या हत्याकांडाची थोडी फार माहिती आहे. मात्र अनेकांना याची पार्श्वभूमी माहीत नाही. यामुळे या हत्याकांडावर ओझरता प्रकाश टाकुया.
पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर हे चुलत भाऊ. एकत्र असलेले कुटुंब राजकारणातील सत्तेत विखुरले गेले. राजकीय प्रतिस्पर्धी पवनराजे निंबाळकर यांनी 2004 साली अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यात डॉ. पद्मसिंह पाटील यांचा केवळ 484 मतांनी विजय झाला होता. डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या या विजयाला पवनराजे यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. केवळ 484 मतांनी विजय, शिवाय न्यायालयात आव्हान देण्यात आल्यामुळे भविष्यात धोका नको म्हणून डॉ. पद्मसिंह पाटील यांनी सुपारी देऊन पवनराजे यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप निंबाळकर कुटुंबीयांनी केला. मात्र या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी प्रथम पारसमल ताराचंद बडाला जैन या व्यापाऱ्याला अटक केली. कालांतराने हा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला. सीबीआयने याप्रकरणी धक्कादायक अटकसत्र सुऊ केल्याने, राज्यात एकच खळबळ माजली होती. डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह कटात सहभागी असलेल्या सर्व आरोपींना सीबीआयने अटक केली. सीबीआयचा माफीचा साक्षीदार पारसमल जैन याने पवनराजे निंबाळकर यांना ठार मारण्याची आपणच सुपारी घेतली होती. हे त्याला अटक झाल्यानंतर दिलेल्या कबुली जबाबात सांगितले होते. त्यानंतरच सीबीआयने त्याला माफीचा साक्षीदार केले होते. त्यात पारसमल जैनचा कबुली जबाब घेण्यात आला. आपल्या जबाबात मला एड्स झाल्याने, मला पैशांची आवश्यकता होती. त्याकरीता मी ही सुपारी घेतली. त्यानंतर उत्तर प्रदेशात जाऊन शुटर आणले. दिनेश तिवारी आणि पिंटू सिंग या दोघांना घेऊन मी मुंबई गाठली.
त्यानंतर सर्व बाबींची माहिती घेत खातरजमा केली. त्यानुसार या दोन्ही शुटरनी कळंबोली येथे पवनराजे आणि त्यांचा ड्रायव्हर समध काझी यांच्या छातीचा वेध घेतला आणि पळ काढला. पारसमल जैन याने हा कबुली जबाब दिला खरा परंतु खटला जेव्हा अंतिम टप्प्यात आला तेव्हा पारसमल याने आपला कबुली जबाब बदलला. याचा फायदा बचाव पक्षाला झाला. वारंवार कबुली जबाब बदलणाऱ्या माफीच्या साक्षीदाराचा जबाब फेटाळून लावला आणि सर्वच्या सर्व आरोपींची न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी निर्दोष सुटका केली. ज्यांच्याविऊद्ध खटला चालू होता त्या नऊ आरोपींपैकी तीन आरोपी सत्तरी, तीन आरोपी साठी आणि अन्य तीन आरोपी चाळीशी पार केलेले आहेत. ठोस पुराव्याअभावी तब्बल 20 वर्षांनी सर्व संशयीत निर्दोष सुटले. या प्रकरणामुळे व्यथित झालेल्या ओमराजेनी न्यायासाठी वरील न्यायालयात दाद मागण्याची तयारी सुऊ केली आहे. केवळ राजकीय वैरभावातून पवनराजेंची हत्या झाली नाही. तर अशा राजकीय हत्येचा महाराष्ट्रात रक्तरंजीत इतिहास आहे. राज्यातील पहिली हत्या ही शिवसेना आमदाराची मुंबईत झाली होती. परळ भारतमाता चित्रपटगृहाशेजारील इमारतीसमोर राहणारे शिवसेनेचे विद्यमान आमदार विठ्ठल चव्हाण यांची 22 मार्च 1992 रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यावेळी लालबाग-परळ येथे दहशत असलेल्या दुबईस्थित गुऊ साटमच्या इशाऱ्यावऊन बच्चा रावळ, प्रल्हाद पेडणेकर, अनिल देसाई उर्फ आर. के, नितीन आंगणे, संतोष ठाकुर उर्फ पोत्या यांनी हा गेम केला. गँगस्टराकडून एका विद्यमान आमदाराची हत्या होण्याची ही राज्यातील पहिलीच घटना होती. यामुळे मुंबई पोलीसच नाही तर राज्य पोलीस आणि संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या प्रकरणातील गुऊ साटम अद्याप सापडला नाही. भांडुप परिसरात वर्चस्व असलेला तसेच विक्रमी मतांनी निवडून येणारा शिवसेनेचा नगरसेवक के. टी. थापा याला भांडुप येथील मंगतराम पेट्रोलपंपाजवळ गोळ्या घालून ठार मारण्यात आले. छोटा राजनच्या इशाऱ्यावऊन दीड डझन गुंडांनी थापाचा गेम केला. थापाचे वाढते वर्चस्व आणि तो वरचढ होत असल्यानेच राजनने त्याचा गेम केला. तर दुसरीकडे अऊण गवळीने मुस्लिम लिगचे माजी आमदार झियाउद्दीन बुखारी याचा गोळया घालून गेम केला. बुखारीला मारण्यासाठी गवळीने 14 गुंड नागपाड्यात घुसविले होते. यावेळी बुखारीने बॉम्बस्फोट घडवून दगडी चाळ उडविण्याचा कट आखल्याची चर्चा त्यावेळेस जोरावर होती. मात्र खरे कारण अरूण गवळीलाच माहीत आहे. तसेच शिवसेनेची फायरब्रँण्ड महिला नगरसेवक आणि गँगस्टर अश्विन नाईकची पत्नी निता नाईक हिची हत्या उघडपणे अश्विन नाईकने केली होती. तर दुसरीकडे शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार रमेश मोरे यांची अंधेरी चार बंगला येथे अरूण गवळीच्या इशाऱ्यावऊन गोळ्या घालून हत्या केली. रमेश मोरेंची हत्या म्हणजे शिवसेनेला मोठा हादरा होता. त्यानंतर दोनच दिवसात भाजपचे आमदार प्रेमकुमार शर्मा यांची खेतवाडीत गाडी आडवी घालून दाऊदचा हस्तक इजाज पठाणने हत्या घडवून आणली.
अशातच गुन्हेगारीच्या क्षेत्रात नव्याने उदयाला येत असलेल्या लॉरेन्स बिश्नोई याने कारागृहात राहून माजी मंत्री बाबा सिद्दीकीची हत्या घडवून आणली. राजकारणातील हा रक्तरंजीत इतिहास पाहिला तर अनेकजण ओमराजेसारखे न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.
अमोल राऊत