For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निसर्गाचा तडाखा

06:49 AM Apr 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
निसर्गाचा तडाखा
Advertisement

महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला उष्णतेच्या लाटा भाजून काढत असतानाच अवकाळी पाऊस व गारपीटीने विदर्भ व मराठवाड्याला दिलेला तडाखा जबरदस्तच म्हटला पाहिजे. मागच्या काही दिवसांपासून राज्याला तीव्र उन्हाळ्याचा सामना करावा लागत आहे. 40 ते 42 अंश सेल्सिअसवरील तापमान, आटलेली जलाशये, टँकरच्या वाढत्या फेऱ्या, कोरड्या ठाक पडलेल्या कूपनलिका यामुळे अनेक जिल्ह्यांतील नागरिक भीषण पाणीटंचाईला सामोरे जात आहेत. अशा या काहिलीत पावसाचा शिडकावा झाला, रिमझिम बरसात झाली, तर कुणासही आनंद वा दिलासाच वाटावा. मात्र, त्याऐवजी वादळवाऱ्यासह व गारपिटीसह अवकाळी पाऊस ठाण मांडत असेल, तर तो दुष्काळात तेरावाच ठरतो. महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांची अवस्था तशीच झाल्याचे दिसून येते. मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागांत पावसाची नोंद होत आहे. तथापि, गेल्या दोन दिवसांत झालेला पाऊस कहरच म्हणता येईल. उपनराजधानी नागपूरसह, यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, या जिल्ह्यांना त्याने ज्या पद्धतीने दणका दिला, तो अभूतपूर्वच म्हणायला हवा. नागपूरमध्ये तर मागच्या दोन ते तीन दिवसांपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळत असून, येथील जनजीवन त्यामुळे विस्कळीत झाल्याचे पहायला मिळते. अमरावती हा विदर्भातील सर्वात बाधित जिल्हा ठरला आहे. संत्री व मोसंबी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या या जिल्ह्dयात पाऊस गारपिटीमुळे 18 हजार 300 हेक्टरवरील संत्र्यासह मोसंबी, केळी, आंबा पिके आडवी झाली आहेत. एकूण 35 हजार 389 हेक्टर क्षेत्रातील रब्बीसह फळपिकांचे झालेले नुकसान न भरून निघणारे ठरते. याशिवाय अकोल्यात साडेचार हजार हेक्टर, बुलढाण्यात साडेतीन हजार हेक्टर, तर यवतमाळमध्ये दोन हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसल्याने आणखी एका संकटाशी शेतकऱ्यांना झुंजावे लागत आहे. मराठवाड्यातही परभणी, बीड, हिंगोली, जिल्ह्यांना पावसाने फटकारल्याने ज्वारी, गहू, हळद, आंबा व भाजीपाला मातीमोल झाल्याचे पहायला मिळते. या वादळी पावसाने मनुष्यहानी झाल्याचीही नोंद असून, काही जिल्ह्यांमध्ये जनावरे दगावण्याचे प्रकार घडल्याचेही सांगितले जाते. पिकांच्या नुकसानीचा आकडा 50 हजार हेक्टरपर्यंत असल्याची माहिती दिली जात असली, तरी प्रत्यक्ष आकडा हा त्यापेक्षा अधिक असू शकतो. मुख्य म्हणजे हवामान विभागाने आणखी दोन दिवस पावसाचा मुक्काम वाढणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या शेतकऱ्यांना पुढेही अस्मानी संकटाशीही लढावे लागणार आहे. खरे तर शेती हा आज बेभरवशी व्यवसाय बनला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी केली वा अन्य सवलती दिल्या, की आपल्याकडे सार्वत्रिक बोंब सुरू होते. मात्र, शेतमालाला रास्त भाव वा हमीभाव देण्याबाबत कुणीही बोलत नाहीत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, दीडपट हमीभाव देऊ, अशा वल्गना फार झाल्या. परंतु, शेतकऱ्याच्या हातात काही फरक पडत नाही, हे वास्तव आहे. शेतीतील अस्थिर परिस्थितीमुळेच शेतीपासून नवी पिढी दूर जात आहे. हेच चित्र कायम राहिले, तर  भविष्यात शेतीपुढे व देशापुढे गंभीर संकट निर्माण होऊ शकते. हे पाहता बळीराजास अशा कठीण समयात मदत करणे, हे सरकारचे कर्तव्य ठरते. निवडणुकीच्या धामधुमीत नियमांच्या चौकटीच्या नावाखाली या पातळीवर दिरंगाई होऊ नये, हे पाहिले पाहिजे. एकीकडे गारपिटीचे संकट उद्भवले असताना राज्याच्या व देशाच्या अनेक भागांत दुष्काळसदृश स्थिती दिसते. देशातील महत्त्वाच्या धरणांतील पाणीसाठाही 35 ते 40 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. तर महाराष्ट्रातही जेमतेम 35 टक्के जलसाठा असल्याचे आकडेवारी सांगते. अद्याप अर्धाअधिक एप्रिल, मे जायचा आहे. यंदाच्या वर्षी नैत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनचे आगमन लांबणार असल्याचेही स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने म्हटले आहे. ही चिंता वाढविणारीच बाब ठरावी. राज्याच्या अनेक भागांत सध्या टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. महिला भगिनींना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ही तीव्रता पुढच्या टप्प्यात आणखी वाढण्याची भीती संभवते. स्वाभाविकच आता पाण्याचा सुयोग्य व काटकसरीने कसा वापर करता येईल, यास प्राधान्य द्यायला हवे. नागरिकांनीही पाण्याचा जपून वापर करावा. प्रशासनानेही पाण्याचे योग्य ते नियोजन करावे. पाण्याची गळती रोखावी. पाण्याचा अपव्यय टाळला, तर बऱ्याच गोष्टी सुकर होऊ शकतात. देशात यंदा सरासरी 102 टक्के म्हणजेच 868.6 मिमी इतका पाऊस होईल, अशी शक्मयताही स्कायमेट या संस्थेने व्यक्त केली आहे. समस्त भारतीयांसाठी हा दिलासाच ठरावा. मागचे वर्ष पाऊसपाण्याच्या दृष्टीने तसे ताणाताणीचे गेले. महाराष्ट्र, कर्नाटकसह अनेक राज्यांमध्ये उणे पावसाची नोंद झाली. या खेपेला चांगला पाऊस होण्याचा अंदाज, हे शुभवर्तमानच ठरावे. वास्तविक, नैत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सून हे भारतासारख्या देशाला मिळालेले वरदानच होय. मान्सूनवरच देशाचे, येथील शेतीचे भरण पोषण होते. इतकेच नव्हे, तर उद्योगधंद्यांपासून ते अर्थव्यवस्थेपर्यंत सगळ्याच महत्त्वाच्या घटकांवर पाऊसमान परिणाम करते. त्यामुळे मान्सूनवर शेतकऱ्यांपासून ते नोकरदारापर्यंत प्रत्येकाचेच लक्ष असते. आज दुष्काळाचे सावट गडद होण्याच्या टप्प्यात आपण आहोत. अशा टप्प्यावर पावसाचा सांगावा दिलासा देतो. प्रशांत महासागरातील एल निनोचे आता ला निनोमध्ये ऊपांतर होत आहे. ला निनोदरम्यान मान्सून चांगला राहिल्याचा इतिहास आहे. तसेच सुपर एल निनोनंतर ला निनो आल्यास मान्सून दमदार राहिला आहे. मान्सूनच्या पहिल्या टप्प्यात एल निनोचा प्रभाव राहणार आहे. मात्र, दुसऱ्या टप्प्यात पाऊस जोरदार राहू शकतो. हिंदी महासागरातील इंडियन ओशन डाय पोलही सकारात्मक राहणार असून, त्यामुळेही मोसमी पावसाची स्थिती चांगली राहण्यास मदत होणार असल्याचे स्कायमेटने म्हटले आहे. तसा अद्याप भारतीय हवामान विभागाचा अंदाज यायचा आहे. मात्र, एल निनोपासूनची मुक्तता पाहता चालू वर्षात निसर्गाची साथ मिळेल, अशी आशा करायला हरकत नाही.

Advertisement

Advertisement
Tags :

.