Miraj News : मिरज तालुक्यातील बेडग येथे 12 फूट खड्ड्यात कोसळली दुचाकी
मिरज-बेडग रस्त्याचे काम सुरू असताना अपघातांचे आवर्तन
मिरज : मिरज तालुक्यातील बेडग येथे सुरू असलेल्या मिरज-बेडग रस्ता कामाच्या ठिकाणी खोदलेल्या सुमारे १२ फुटाच्या खोल चरीत दुचाकीसह दोघे तरुण पडल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. यामध्ये दोघेजण जखमी झाले आहेत. रस्ता काम सुरु असल्याने मिरज-बेडग रस्ता धोकादायक बनला आहे. गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात खोदलेल्या या चरीच्या ठिकाणी वाहनधारकांसाठी कोणत्याही प्रकारची सुरक्षा नाही. त्यामुळेच हा अपघात घडल्याचे दिसून आले.
मिरज-बेडग-आरग-लिंगनूर ते बेळंकी या ३१ कि.मी. रस्त्याचे राज्य शासनाच्या हॅम या योजनेतून काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराजवळ पूल बांधण्यात येत असून, यासाठी सुमारे १० ते १२ फुटांची मोठी चर खोदली आहे. शुक्रवार रात्री दहाच्या दरम्यान बेडग मार्गे दोन प्रवासी मोटरसायकलने मिरजेला असताना खोल खड्यात दुचाकी (एमएच ०९-एजे-६२१३) सह मोहन पांडूरंग हजारे (वय ५९, रा. कुमठे), दत्तात्रय रामा पुजारी (वय ५८, रा. कोथळी) हे दोघे पडले.
या अपघातात दुचाकीचे नुकसान झाले. तर दोघेजण जखमी झाले. स्थानिक ग्रामस्थांनी जखमींसाठी मदत कार्यराबवून त्यांना रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, या रस्ताचे काम सुरू झाल्यापासून वारंवार अपघात घडत आहेत. यापूर्वी तर असाच अपघात होऊन एकाचा बळी गेला. या रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी दिशादर्शक फलक नाहीत. रस्त्यावर पाणी मारले जात नाहीत. त्यामुळे पिकांचेही नुकसान होत आहेत. सदर कामावर प्रशासनाचे लक्ष नाही. ठेकेदार कामचुकारपणा करीत आहे. त्याकडे लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत आहे. नादुरुस्त रस्त्यामुळे निष्पापांचा बळी गेल्याने प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल ग्रामस्थांतून केला जात आहे.