महापालिकेमध्ये मोठी उलथापालथ
अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल, आयुक्तांचा दणका
प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेचे कामकाज सुरळीत व्हावे, यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. तब्बल 64 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या बदलण्यात आल्या असून त्यांना नवीन कामे देण्यात आली आहेत. नवीन आयुक्तांनी काही दिवसांतच दणका दिल्याने शनिवारी मनपा कर्मचाऱ्यांमध्ये याचीच चर्चा होती.
बेळगाव महानगरपालिकेमध्ये मागील अनेक दिवसांपासून अधिकारी व कर्मचारी एकाच जागेवर होते. याचा परिणाम कामकाजावर होत होता. काही कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे सर्वांचीच डोकेदुखी वाढली होती. परंतु या समस्येबाबत कोणीच बोलण्यास तयार नव्हते. ही बाब नुकत्याच रूजू झालेल्या आयुक्तांच्या निदर्शनास आली. जबाबदाऱ्या बदलल्यास काम सुरळीत होईल, या उद्देशाने शनिवारी मोठा निर्णय घेण्यात आला.
आयुक्त शुभा बी. यांनी 64 अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी बदलण्यात आली आहे. नवीन जबाबदारी देण्यात आल्याने ते कर्मचारी कसे कामकाज करतात, हे पहावे लागणार आहे. परंतु यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकच चर्चा होती.