आंबोली घाटात कोसळला भलामोठा दगड
पहाटेच्या घटनेमुळे दुर्घटना टळली
वार्ताहर /आंबोली
आंबोली घाटात ब्रिटिशकालीन चाळीस फुटाच्या मोरीवर पहिल्याच मान्सूनपूर्व पावसात भलामोठा दगड रस्त्यावर आला. ब्रिटिशकालीन मोरी मजबूत असल्याने ती कोसळली नाही. फक्त घाटरस्ता खचला असून सुरक्षिततेचा उपाय म्हणून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. पावसाळी पर्यटनाच्या तोंडावरच ही घटना घडल्याने पर्यटकांत भीतीचे वातावरण आहे. पहाटे साडेतीनच्या सुमारास कोणतेही वाहन रस्त्यावर नसल्याने मोठा अनर्थ टळला. सकाळी 10.30 च्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाने हा दगड जेसीबीच्या साहाय्याने घाटात ढकलला. घाटात चाळीस फुटाच्या ब्रिटिशकालीन मोरीवर गुऊवारी पहाटे 3.30 च्या सुमारास घाटमाथ्यावरून मोठा दगड घरंगळत खाली रस्त्यावर येऊन आदळल्याने रस्त्याच्या मधोमध खड्डा पडला आहे. दगड रस्त्यावर जोरात आदळल्याने रस्त्याला भेगा पडल्या असून दरीच्या बाजूने रस्ता पूर्णपणे खचला आहे. अवजड वाहने या ठिकाणाहून गेल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
पर्यटकांमध्ये भीती
आंबोलीत सध्या मान्सूनपूर्व पावसामुळे धुके, हलक्या पावसाच्या सरी कोसळत असल्याने या ठिकाणी पर्यटकांची रेलचेल सुरू झाली आहे. पर्यटक थोड्याफार प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत. परंतु, गुरुवारच्या घटनेमुळे पर्यटक तसेच वाहनधारकांत भीतीचे वातावरण आहे. अशी घटना पुन्हा घडल्यास आंबोलीच्या पावसाळी पर्यटनाला फटका बसू शकतो. त्यामुळे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वनविभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने योग्य खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे मत स्थानिकांतून व्यक्त होत आहे.