महापुराचा कायम स्वरूपी उपाय योजना करण्यासाठी मोठा निधी उभा करणार- खासदार धैर्यशील माने
सैनिक टाकळी प्रतिनिधी
कृष्णा पंचगंगा दूधगंगा नदी काठच्या नागरिकावरती 2019 पासून 24 अखेर महापुराच्या रूपाने तीन वेळा अस्मानी संकट कोसळले आहे. पूर लवकर न ओसरल्यामुळे शेती व्यवसायास मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसतो. पूरग्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी 2019 प्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केले.
खासदार धैर्य़शील माने यांनी नवे दानवाड, जुने दानवाड, टाकळी, खिद्रापूर, राजापूर , राजापूरवाडी पूरग्रस्त गावांना भेटी दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, गेल्या पाच वर्षात या नागरिकांना तीन वेळा महापुराच्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. कमी कालावधीमध्ये जास्त पडणारा पाऊस हा महापुरास कारण ठरत असला तरी यावरती कायमस्वरूपी उपाय योजना करण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. जागतिक बँकेच्या मदतीतून सुमारे 3200 कोटीचा निधी महापूर काळातील अतिरिक्त पाणी दुष्काळ भागाकडे वळवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून मंजूर झाला असल्याचे त्यांनी सांगितले. माजी पंतप्रधान स्व.अटल बिहारी वाजपेयी यांच्या संकल्पनेतील नदीजोड प्रकल्प यशस्वी झाल्यास भविष्यात महापुरात होणारे नुकसान आपण टाळू शकतो.असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी पूरग्रस्त नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.