मोठा कट उधळला
चार दहशतवाद्यांचा काश्मीरमध्ये खात्मा
ट्रकमध्ये लपून घुसखोरीचा प्रयत्न तपासणीवेळी गोळीबार केल्याने चकमक
श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मूच्या सिध्रा भागात बुधवारी सकाळी सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. ट्रकमधून घुसखोरी करत असताना त्यांना चकमकीत ठार करण्यात आले. या कारवाईनंतर आणखी काही दहशतवादी लपून बसल्याची भीती गृहीत धरून दिवसभर परिसरात शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. जप्त करण्यात आलेल्या ट्रकमधून मोठय़ा प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आल्याचे सुरक्षा सूत्रांनी सांगितले.
घुसखोरी केलेले दहशतवादी ट्रकमधून काश्मीरच्या दिशेने जात होते. 26 जानेवारीला किंवा त्याच्या आसपास ते मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होते, अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी दिली. सिध्रा परिसरात ट्रकची संशयास्पद हालचाल होती. पोलिसांनी हा ट्रक बायपास रोडवर थांबवून चालकाची चौकशी केल्यानंतर तो पळून गेला. याचदरम्यान ट्रकची तपासणी सुरू करताच आतमध्ये बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सुरक्षा जवानांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर दहशतवादी आजूबाजूच्या भागात पळून गेले. एका घरात लपून बसल्यानंतर दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर बराच वेळ गोळीबार केला. यानंतर त्यांना चकमकीत ठार करण्यात आले. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये बराच वेळ चकमक सुरू होती.
घुसखोरी केलेल्या दहशतवाद्यांनी मोठय़ा प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा सोबत आणला होता. हा साठा ट्रकमध्ये असल्यामुळे सुरक्षा दलांनी ट्रकही जप्त केला आहे. जम्मू-काश्मीर हायवेच्या बायपासवर ट्रक रोखण्यात आला होता. दहशतवाद्यांची संख्या चारपेक्षा जास्त असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळेच चकमकीनंतर व्यापक शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. आजूबाजूला जंगलभाग असून परिसरात हवामानही खराब आहे. दाट धुक्याचा फायदा घेत उर्वरित दहशतवादी पळून जाऊ शकतात, अशी भीती पोलिसांना आहे.