मुस्लीम पक्षाला मोठा धक्का
श्रीकृष्ण जन्मभूमी वादप्रकरणी अलाहाबाद न्यायालयाने अपील फेटाळले : खटल्यांच्या एकत्रीकरणाचा निर्णय मागे घेण्यास नकार
वृत्तसंस्था/ प्रयागराज
उत्तर प्रदेशच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाने कृष्णजन्मभूमी-शाही ईदगाह वादाशी संबंधित 15 प्रकरणे एकत्रित करण्याच्या आपल्या जानेवारी 2024 च्या आदेशाविऊद्ध दाखल केलेला रिकॉल अर्ज फेटाळला. मुस्लीम पक्षाच्या वतीने हा अर्ज दाखल करण्यात आला होता. नुकतीच न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करून निर्णय राखून ठेवला होता. आता निकाल देताना न्यायालयाने खटले एकत्र करण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करत मुस्लीम बाजूचे अपील फेटाळून लावले आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने मुस्लीम बाजूने दाखल केलेल्या अर्जावर गेल्या आठवड्यात आपला निर्णय राखून ठेवला होता. सदर याचिकेमध्ये 11 जानेवारी 2024 चा न्यायालयाचा आदेश मागे घेण्याची विनंती करण्यात आली होती. या आदेशात उच्च न्यायालयाने हिंदू बाजूने दाखल केलेल्या सर्व खटल्यांशी संबंधित सर्व खटले एकत्र केले होते. या निर्णयाविरोधात मुस्लीम पक्षाने याचिका दाखल केली होती. 11 जानेवारी 2024 च्या न्यायालयीन आदेशान्वये एकत्र जोडण्यात आलेले खटले मागे घेण्यात यावे, असा आग्रह मुस्लीम पक्षातर्फे वकील तस्नीम अहमदी यांनी धरला होता. सदर आदेशात न्यायालयाने वादाशी संबंधित 15 प्रकरणे एकत्र आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. तथापि, मालमत्ता आणि प्रतिवादी एकसमान असल्यामुळे न्यायालयाला प्रकरणे एकत्रित करण्याचा अधिकार आहे, असे हिंदू पक्षाने म्हटले होते. हिंदूंची बाजू मांडणारे अधिवक्ता हरिशंकर जैन यांनी यावर युक्तिवाद करताना खटले एकत्र येणे म्हणजे सर्व खटले लढण्याचा अधिकार गमावला जाणे असा होत नसल्याचे स्पष्ट केले.
शाही इदगाह मशिदीची रचना हटवल्यानंतर तसेच त्या ठिकाणच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आणि कायमस्वरूपी मनाई आदेशासाठी हिंदू पक्षाने हे खटले दाखल केले आहेत. हा वाद मथुरेतील मुघल सम्राट औरंगजेबच्या काळातील शाही ईदगाह मशिदीशी संबंधित आहे, जी भगवान कृष्णाच्या जन्मस्थानी असलेले मंदिर पाडून बांधण्यात आली होती.
हिंदू पक्षाची बाजू मजबूत
मशिदीच्या बाजूने दाखल करण्यात आलेली रिकॉल याचिका फेटाळून उच्च न्यायालयाने वादाशी संबंधित 15 प्रकरणांची एकाचवेळी सुनावणी घेण्याचा मार्ग मोकळा केला आहे. न्यायमूर्ती मयंक कुमार जैन यांच्या एकल खंडपीठाने मशिदीच्या बाजूची याचिका फेटाळून लावत हिंदू पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरला. न्यायालयाच्या या निर्णयाकडे मथुरा वादात हिंदू पक्षाचा मोठा विजय म्हणून पाहिले जात आहे. आता या सर्व याचिकांवर 6 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता एकत्रित सुनावणी होणार असून, त्यात चर्चेच्या मुद्यांवर निर्णय होणार आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे मथुरा वादाला नवी दिशा मिळू शकते.