For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भावनेची लढाई

06:43 AM May 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
भावनेची लढाई
Advertisement

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील 11 जागांसह देशातील 93 मतदारसंघांमध्येही मतप्रक्रिया पार पडली आहे. म्हणजेच निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याकरिता आणखी चार टप्पे शिल्लक आहेत. या कालावधीत राजकीय पक्षांकडून साम, दाम, दंड, भेदासारख्या आयुधांचा मुक्तहस्ते वापर झाल्याचे दिसते. किंबहुना, केवळ या शस्त्रांवरच लढाई जिंकणे सहजशक्य होईल, असे नव्हे. त्यामुळे कळत नकळत म्हणा किंवा जाणून बुजून म्हणा. अश्रू वा आसवास्त्राचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे. अगदी पंतप्रधान नरेंद्री मोदी यांच्यापासून ते आमदार रोहित पवार यांच्यापर्यंत प्रत्येकाने या भावनिक राजकारणातून मतदारांवर प्रभाव टाकल्याची बाब लपून राहत नाही. 2014 मध्ये देशभरात मोदी लाट पहायला मिळाली. या लाटेत कागदावर तुल्यबळ नसणारे उमेदवारही सहजगत्या निवडून आले. अच्छे दिनचे मोदींनी दाखविलेले स्वप्न या निवडणुकीत निर्णायक ठरले. तर 2019 च्या निवडणुकीत सर्जिकल स्ट्राईक व देशभक्तीच्या भावनेने मोदी सरकारला निर्भेळ यश मिळवून दिले. आता 2024 मध्ये मोदी सरकार हॅट्ट्रिकच्या तयारीत असले, तरी ग्राऊंडवर अपेक्षित लाट पहायला मिळत नाही. राम मंदिर, 370 सारखे मुद्देही काहीसे बाजूला पडलेले दिसतात. विरोधकांसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या महागाई वा बेरोजगारीच्या मुद्द्याचीही तीच अवस्था आहे. त्यामुळे सत्ताधारी व विरोधक ध्रुवीकरण, आरक्षणासह भावनिक मुद्दे हातात घेताना दिसतात. एरवी आपल्या करारी व्यक्तिमत्त्वासाठी प्रसिद्ध असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदीही अधूनमधून भावूक होत असतात. यंदाही निवडणूक प्रचारादरम्यान मोदी भावनिक झाल्याचे वारंवार पहायला मिळाले. टीव्ही 9 च्या मुलाखतीतही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलताना मोदी हळवे झाल्याचे देशाने पाहिले. इतकेच नव्हे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलतानाही ते भावूक झाल्याचे दिसून आले. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे सुपुत्र आहेत. त्यांच्याबद्दल मला प्रेम आहे. उद्या ते संकटात सापडले, तर त्यांना पहिला मदत करणारा मीच असेन, अशी हळवी लाईनही मोदींनी पुढे नेली. त्यामागे उद्धव यांना महाराष्ट्रात मिळू पाहणारे यश असल्याचे सांगण्यात येते. सेना व भाजपातील मैत्र तसे अनेक वर्षांचे. सेनेसारख्या पक्षाला नाजूकपणे कसे हाताळायचे, याचे तंत्र प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या नेत्यांना अवगत होते. मात्र, त्यांच्या निधनानंतर खडसे, फडणवीस प्रभृतींना हे मैत्र पुढे नेता आले नाही. त्याची परिणती युती तुटण्यात झाली. त्यानंतर महाशक्तीच्या पुढाकारातून व एकनाथ शिंदेंना पुढे करून सेनेत अभूतपूर्व फूट घडवून आणण्यात आली. परंतु, शिंदे वा अजितदादा पवार यांच्या माध्यमातून पूर्वीचे यश मिळविणे अवघड असल्याची जाणीव भाजपाला होऊ लागली आहे. मागील निवडणुकीत सेना व भाजपा युतीला 42 जागा मिळाल्या होत्या. या खेपेला इतक्या जागा येणे अशक्य असल्याचे भाजपवालेच खासगीत सांगतात. राज्यात महायुती व महाविकास आघाडीला समसमान जागा मिळतील. तर उद्धव ठाकरे यांना चांगला प्रतिसाद मिळेल, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर एकेकाळच्या मित्राकडून भावनिक पेरणी होत असेल, तर त्यातला मथितार्थ समजून घ्यायला हवा. याद्वारे मोदी यांनी उद्धव यांच्या सेनेलाच चुचकारण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. यातून मुंबई वा महाराष्ट्रातील स्वपक्षावरचा रोष कमी करण्याचाही त्यांचा प्रयत्न असावा.  मुख्य म्हणजे हे करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावना दुखावणार तर नाहीत ना, याचीही तमा त्यांनी बाळगलेली नाही. उद्धव ठाकरेंनीही होय माझेही तुमच्यावर प्रेम आहे आणि मीही तुमच्या मदतीसाठी कायम पुढे असेन, असे भावस्पर्शी उत्तर देत व्यक्तिगत मोदींना विरोध नसल्याचे अधोरेखित केले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात अखेरच्या दिवसापर्यंत भावनेचे राजकारण पहावयास मिळाले. सुनेत्रा पवार यांना निवडून द्या. अन्यथा, मी विधानसभेतून माघार घेईन, हा दादांचा इशारा म्हणजे असाच भावनात्मक खेळ. दोन्ही बाजूकडून त्याचा वारंवार वापर झाल्याने भावनिकतेच्या मुद्द्यावरच ही निवडणूक झाल्याचे दिसले. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळेंच्या प्रचाराची सांगता सभेतील आमदार रोहित पवार यांचे भावूक होणे, हा त्याचाच भाग. या सभेत पक्ष फुटला, तेव्हा पवारसाहेबांची स्थिती काय होती, हे सांगताना आमदार रोहित पवार यांना रडू कोसळते काय नि मीही रडतो. मलाही मतदान करा, अशा शब्दांत दादा त्याची मिमिक्री करतात काय, हे सगळेच निवडणुकीतील वेगवेगळ्या पैलूचे दर्शन घडविणारे होय. अगदी मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे यांनी अजितदादांच्या निवासस्थानी भेट देत त्यांच्या मातोश्रींचे घेतलेले आशीर्वाद हाही त्याचाच पुढचा अंक म्हणायला हवा. पवार विऊद्ध पवार सामन्यामुळे बारामतीत कार्यकर्त्यांमध्ये, अगदी प्रत्येक घरात दोन गट पडल्याचे पहायला मिळते. कुणाला मत द्यायचे, यावरून द्विधा मन:स्थिती असताना ताईंनी दिलेली ही भेट भावनेला हात घालणारी ठरते. आमच्यात राजकीय कटुता निर्माण झाली. परंतु, भविष्यात आम्ही एकत्र येऊ शकतो, हेच जणू सुप्रियाताईंनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. त्यातून कार्यकर्त्यांमधील संभ्रम वाढविण्याचा त्यांचा उद्देश असू शकतो. मतदारांवर प्रभाव टाकण्यात यास यश मिळाले, तर हा मास्टरस्ट्रोक म्हटला पाहिजे. मागच्या 50 ते 55 वर्षांच्या राजकारणात पवारांनी अनेक डाव खेळले. कोणताही आक्रस्ताळेपणा न करता शांतपणे समोरच्याचा काटा काढण्याचे असाधारण कौशल्य पवारांकडे आहे. त्यामुळे काटेवाडीच्या भेटीमागचा मेंदूही पवारांचाच असल्याचे मानले जाते. डोळ्यात पाणी आणणे असो वा ही माझी शेवटची निवडणूक असल्याचे उद्गार असोत. निवडणूक ही भावनेचीही लढाई आहे. त्यात कुणाची सरशी होते, हेच पहायचे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.