मुंबई, चेन्नईसाठी आज अस्तित्वाची लढाई
वृत्तसंस्था
चेन्नई : आयपीएल, 2026 मधील आव्हान धोक्यात असताना चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आज शनिवारी चेन्नईमध्ये सामना होणार असून दोन्ही संघांच्या दृष्टीने ‘जिंकणे आवश्यक’ असा हा सामना आहे. दोन्ही संघ आपला अस्थिर फॉर्म बदलून प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी आतुर आहेत.
आयपीएलच्या इतिहासातील या दोन सर्वांत यशस्वी संघांसाठी आतापर्यंतचा हंगाम विसरण्यासारखाच राहिला आहे, कारण दोन्ही संघांना सातत्यपूर्ण लय राखता आलेली नाही. एम. ए. चिदंबरम स्टेडियममधील परिस्थिती सीएसकेसाठी अधिक परिचित असली, तरी त्यांच्या कामगिरीत तो अचूकपणा दिसून आलेला नाही, ज्यासाठी गेल्या काही वर्षांपासून त्यांना ओळखले जाते. त्यांची फलंदाजी, विशेषत: मधल्या षटकांमध्ये, अस्थिर राहिली आहे, तर घरच्या मैदानावर त्यांची नेहमी ताकद राहिलेली गोलंदाजी दबावाखाली सामने जिंकण्याच्या बाबतीत संघर्ष करत आहे.
मुंबई इंडियन्सची कामगिरी देखील या हंगामात कधी चांगली, तर कधी वाईट राहिली आहे. त्यांच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांनी अधूनमधून चमकदार कामगिरी करूनही पाच वेळच्या विजेत्या संघाला कमकुवत मधल्या फळीने आणि निराशाजनक गोलंदाजी आक्रमणाने निराश केले आहे. हे गोलंदाजी आक्रमण धावसंख्येचा बचाव करण्यात किंवा महत्त्वाच्या क्षणी विरोधी फलंदाजांना रोखण्यात अपयशी ठरले आहे.
लीग निर्णायक टप्प्यात प्रवेश करत असल्याने या सामन्याला अतिरिक्त महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण दोन्ही संघ आपले नशीब पालटण्याचा प्रयत्न करत आहेत. चेपॉकच्या संथ खेळपट्टीचा फायदा आपले फिरकी गोलंदाज घेतील अशी सीएसकेला आशा असेल, तर फिरकीच्या धोक्याचा सामना करण्यासाठी मुंबई आपल्या पॉवर हिटर्सवर अवलंबून असेल. सध्याचा फॉर्म पाहता कोणताही संघ विजयाचा स्पष्ट दावेदार नाही, त्यामुळे आयपीएलमधील या पारंपरिक प्रमुख प्रतिस्पर्ध्यांच्या दृष्टीने आजचा सामना ही वर्चस्वापेक्षा अस्तित्वासाठीची लढाई जास्त आहे.
आठ सामन्यांत तीन विजयांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर असलेला ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील सीएसके संघ सातत्यहीन कामगिरी, नकारात्मक नेट रन रेट आणि एम. एस. धोनीच्या दीर्घ अनुपस्थितीमुळे प्लेऑफमधील स्थानाच्या बाबतीत अनिश्चिततेचा सामना करत आहे. नवीन खेळाडू संजू सॅमसन हा सीएसकेचा सर्वोत्तम फलंदाज ठरला आहे, त्याने दोन धडाकेबाज शतकांसह आठ डावांमध्ये 300 हून अधिक धावा केल्या आहेत आणि पुन्हा एकदा फलंदाजीची जबाबदारी त्याच्यावर असेल.
गोलंदाजीमध्ये जेमी ओव्हरटन आणि अंशुल कंबोज यांनी सीएसकेसाठी प्रभावी कामगिरी केली आहे, त्यापैकी ओव्हरटनने दिल्ली कॅपिटल्सविऊद्ध 18 धावांत 4 बळी अशी कामगिरी करत या हंगामातील सर्वोत्तम गोलंदाजीची नोंद केली. दुसरीकडे, बुधवारी सनरायझर्स हैदराबादविऊद्ध त्यांच्याच मैदानावर 243 धावांचा बचाव करण्यात अपयशी ठरल्याने मुंबईच्या मोहिमेला अधिकच धक्का बसला आहे. यामुळे त्यांच्या गोलंदाजीतील अपुरेपणा उघड झाला आहे. नवव्या स्थानावर असलेल्या मुंबई इंडियन्सपेक्षा चेन्नई सुपर किंग्स किंचित चांगल्या स्थितीत आहे आणि प्लेऑफसाठी पात्र ठरण्याची संधी मिळविण्यासाठी 16 गुणांपर्यंत पोहोचण्याकरिता मुंबईला आपले उर्वरित सर्व सहा सामने जिंकावेच लागतील. आणखी एक पराभव झाल्यास मुंबई इंडियन्सला नेट रन रेट आणि इतर सामन्यांच्या निकालांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहावे लागेल.
संघ-चेन्नई सुपर किंग्स : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), संजू सॅमसन, शिवम दुबे, डेवाल्ड ब्रेविस, जेमी ओव्हरटन, मॅथ्यू शॉर्ट, अंशुल कंबोज, नूर अहमद, अकेल होसेन, गुरजपनीत सिंग, मुकेश चौधरी.
मुंबई इंडियन्स : हार्दिक पांड्या (कर्णधार), विल जॅक्स, रायन रिकल्टन, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, ए. एम. गझनफर, अश्वनी कुमार, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट.
सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 वा.