For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई

06:22 AM May 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई
Advertisement

विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 16 जागांसाठी होत असलेल्या निवडणूकीत कोण किती जागा लढणार? यावऊन तणाव वाढताना दिसत आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत महायुतीतील भाजप आणि शिवसेनेची ताकद वाढल्याने भाजप आणि शिवसेनेत जागा वाटपाचा फॉर्म्युला काही ठरताना दिसत नाही. उध्दव ठाकरे यांच्या एकसंध शिवसेनेच्या कार्यकाळात झालेल्या या निवडणूकीत 16 पैकी पाच जागांवर शिवसेनेचे आमदार होते. आता मात्र भाजप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची चार जागांवर बोळवण करण्याची शक्यता दिसत आहे, त्यामुळे शिवसेना शिंदे गटाला आहे त्या पाच जागा मिळणार का? की पाचाचे चार होणार, त्यासाठी निवडणूकीपूर्वीच शिवसेना शिंदे गटाची कसोटी लागणार आहे.

Advertisement

विधानपरिषदेच्या 16 जागांसाठी होत असलेल्या निवडणूकीसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. 2024 च्या विधानसभा निवडणूकीनंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका या महायुतीने स्वबळावर लढल्या होत्या. या निवडणूकीत विरोधीपक्षाची स्पेस देखील सत्ताधारी पक्षाने खाताना भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपली ताकद वाढवली. पक्षाची ताकद वाढल्याने स्थानिक पातळीवर कार्यकर्ते आणि नेत्यांना विधानपरिषदेवर जाण्याची मोठी संधी आता निर्माण झाल्याने अनेक जागांवर दोन्ही पक्ष दावा करताना दिसत आहेत. ठाणे, जळगाव, रत्नागिरी-रायगड, नाशिक आणि पुणे या जागांचा गुंता कायम आहे. तर पुण्यातील जागेवर राष्ट्रवादीने दावा केलेला असताना, दुसरीकडे भाजपने आपली ताकद वाढल्याचे सांगत ही जागा भाजपला मिळावी अशी मागणी केली आहे. एकनाथ शिंदे यांचे होमग्राऊंड असलेल्या ठाणे स्थानिक स्वराज्य संस्थेतील पालघर, कल्याण, उल्हासनगर, वसई-विरार या भागात भाजपची ताकद गेल्या दहा वर्षात चांगलीच वाढली आहे. या निवडणूकीसाठीचे मतदारांचे संख्याबळ बघता भाजपची संख्या जास्त असल्याने या जागेवर भाजपने दावा केला आहे. तर शिवसेना शिंदे गटाने त्यांच्याकडे असलेल्या ठाणे, नाशिक, यवतमाळ, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या पाच जागांबरोबरच जळगाव आणि रत्नागिरी-रायगड या जागांची मागणी केली आहे. जळगाव आणि रत्नागिरीत शिवसेनेची ताकद वाढल्याने या अतिरीक्त दोन जागा म्हणजेच एकुण 7 जागा मिळाव्यात अशी मागणी शिवसेनेने केली आहे. कोकणात भाजपपेक्षा शिवसेनेची ताकद जास्त आहे, त्यामुळे राष्ट्रवादीला पुन्हा आता ही जागा मिळणे अवघड दिसत आहे. कारण राष्ट्रवादीने पुण्याच्या जागेवर दावा केला आहे, त्यामुळे राष्ट्रवादीला एकच जागा मिळण्याची शक्यता आहे. 2016 ला झालेल्या या निवडणूकांचा आणि 16 जागांचा आढावा घेतल्यास अहिल्यानगर, पुणे आणि रायगड-रत्नागिरी या तीन जागांवर राष्ट्रवादीचे आमदार निवडून आले होते. कोकणातील जागेवर शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी यांनी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगत ही जागा शिवसेनेला मिळावी अशी मागणी केली आहे.

गेल्या 25-30 वर्षापासून भाजपकडे असलेल्या जळगावच्या जागेवर शिवसेनेने दावा केला आहे. या जागेवऊन भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात चांगलीच जुंपली आहे. धुळे जळगावमध्ये शिवसेनेची ताकद वाढल्याचे सांगत शिवसेनेने या जागेसाठी हट्ट धरला आहे. नाशिकच्या जागेवर शिवसेनेकडून नरेंद्र दराडे हे इच्छुक आहेत, मात्र या जागेसाठी राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. छत्रपती संभाजीनगर या मतदार संघातून 2019 ला शिवसेनेचे अंबादास दानवे निवडून गेले होते, आता शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी या जागेसाठी दावा केला आहे. मात्र भाजपने या जागेवर दावा केल्याने या जागेसाठी देखील मोठी रस्सीखेच पहायला मिळणार आहे.

Advertisement

1 जून ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे, येत्या दोन दिवसात महायुतीत जागावाटपासाठी बैठक होण्याची शक्यता आहे. 2016 ला झालेल्या या निवडणूका आणि आताची परिस्थिती यामध्ये बरीच तफावत झाली असून, भाजपची सगळ्याच भागात ताकद वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे भाजपशिवाय महायुतीतील घटकपक्ष या निवडणूका स्वबळावर लढण्याची शक्यता कमी आहे.

सोमवार 25 मे पासून या निवडणूकीच्या रणधुमाळीला सुरूवात झालेली असतानाच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसचे 60 नगरसेवक नॉट रीचेबल असल्याचे सांगताना, प्रत्येक नगरसेवकाला प्रत्येकी 15 लाख ऊपये देण्याचे अमिष दिल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसला 2016 च्या निवडणूकीत या 16 जागांपैकी नांदेड आणि सातारा-सांगली या दोन जागांवर विजय मिळाला होता. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. भाजप 12 जागा लढण्यावर ठाम असल्याचे सध्या तरी दिसत आहे, 2016 च्या याच निवडणूकांमध्ये भाजपकडे बीड, सोलापूर, अमरावती, वर्धा, भंडारा आणि जळगाव या सहा जागांवर आमदार होते, आता मात्र भाजप बारा जागांवर लढणार असल्याने भाजपला थेट 6 जागांचा फायदा होणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे महायुतीचा विचार केल्यास राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा पक्ष फुटीनंतर होणाऱ्या या पहिल्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये नुकसान होताना दिसत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी एकसंध असताना त्यांची मोठी ताकद प्रत्येक मतदार संघात होती, मात्र पक्षाचे विभाजन झाल्यानंतर एकीकडे भाजपची ताकद वाढली तर दुसरीकडे या दोन्ही पक्षांची विभागणी झाली आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीला भाजपकडून पाहिजे असलेल्या जागा मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे.

प्रवीण काळे

Advertisement
Tags :

.