For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुंबई-रायगडमध्ये वर्चस्वासाठी शह-काटशह

06:12 AM Apr 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
मुंबई रायगडमध्ये वर्चस्वासाठी शह काटशह
Advertisement

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाला शिंदे गटाकडून मिळणारे धक्के काही थांबायचे नाव घेत नाहीत, मुंबई महापालिका निवडणुकीत दोन्ही शिवसेनेची कसोटी लागणार आहे. मुंबईत उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पाया मजबुत आहे, शिवसेना ठाकरे गटाला विधानसभा निवडणुकीत राज्यात इतर ठिकाणी जरी फटका बसला असला तरी मुंबईत मात्र 10 जागा मिळाल्या. आता मुंबई महापालिका निवडणुकीत दोन्ही शिवसेनेचा कस लागणार असून उध्दव ठाकरे यांचे एक एक शिलेदार शिंदे गटात सामील होत असल्याने ठाकरे गटासमोर पक्षाला लागलेली गळती थांबवण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

Advertisement

मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो, शिवसेनेची मुंबई महापालिकेत निर्विवाद सत्ता आहे. मात्र शिवसेनेत फुट पडल्यानंतर आता मूळ शिवसेना कोणाची हा प्रश्न लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतरही कायम आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना मुंबईत एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. ठाकरे गटातील माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांची पक्ष सोडण्याची मालिका कायम असून पक्षाला लागलेली गळती काही थांबण्याचे नाव घेत नाही, कोकणात ठाकरे गटाच्या अस्तित्वाबाबतच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विधानसभा निवडणूक लढवून पराभव झालेल्यांपैकी वैभव नाईक वगळता संजय कदम, स्नेहल जगताप, राजन साळवी यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे तर मुंबईत शिवसेनेचा महापालिकेत चेहरा असलेल्या राजुल पटेल, संध्या दोषी नाना अंबोले यांच्यानंतर आक्रमक महिला असलेल्या संजना घाडी आणि त्यांचे पती संजय घाडी यांनी रविवारी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुंबईत एकनाथ शिंदे यांनी वर्चस्व सिध्द करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत, ठाकरे गटातून एकीकडे पक्षाला गळती लागलेली असताना दुसरीकडे ठाकरे गटाकडून धडाधड नियुक्त्या करून डॅमेज कंट्रोल रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. लालबाग राजा गणेशोत्सव मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांची ठाकरे पक्षाच्या सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Advertisement

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत साळवी हे शिवडी विधानसभा मतदार संघातून इच्छुक होते, मात्र पक्षाशी निष्ठावंत राहिलेल्या सगळ्या आमदारांना पुन्हा संधी देण्यात आल्याने अजय चौधरी यांना उमेदवारी मिळाली.

चौधरी यांची ही शेवटची आमदारकी असल्याने पुन्हा साळवी यांना पुढील निवडणुकीत संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यातच शिवडी, वरळी, माहीम हे विधानसभा मतदार संघ शिवसेना ठाकरे गटाचे बालेकिल्ले असल्याचे विधानसभा निवडणुकीत पहायला मिळाले. हे बालेकिल्ले भेदणे भाजप आणि शिंदे गटाला शक्य झाले नाही, मुंबईत ठाकरे गटाचे अनेक नगरसेवक, आमदार शिंदे गटात आले मात्र ठाण्याच्या तुलनेत मुंबईत अजुनही शिंदे गटाला चेहरा मिळालेला नाही.

तर दुसरीकडे मुंबईत उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पाया मुंबईत अजुनही मजबुत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाने मुंबईत आपण शिंदे गटापेक्षा सरस असल्याचे दाखवून दिले आहे. दुसरीकडे भाजपचा मुंबईत बेस वाढत असला तरी शिवसेनेच्या तुलनेत समर्पित कार्यकर्ते भाजपकडे नाहीत, भाजपकडे असलेले कार्यकर्ते हे सत्तेच्या प्रभावाने जवळ आलेले आहेत. त्याचमुळे मुंबईत झालेल्या पदवीधर आणि शिक्षक विधानपरिषद निवडणुकीत भाजप उमेदवाराचा झालेला पराभव हा सर्व काही सांगून जातो. दोन्ही शिवसेनेत प्रत्येक मुद्यावऊन राजकारण रंगत आहे, कुणाल कामरा प्रकरणात तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेविरोधात सगळेच विरोधी पक्ष उभे राहिले तर भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांची बाजु घेतली.

मात्र राष्ट्रवादीने मात्र यामध्ये कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याचे दिसले. शिवसेना ठाकरे गटाकडून देवेंद्र फडणवीस यांना चुचकारण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मोदी यांचा वारसदार हा महाराष्ट्रातून असणार असे शिवसेना ठाकरे गटाकडून बोलले गेले, ठाकरे गटाकडून एकीकडे शिंदे यांना टार्गेट केले जात असताना दुसरीकडे फडणवीस यांच्याबाबत मात्र नरमाईची भूमिका घेतली जात आहे. तर दुसरीकडे भाजपकडून राष्ट्रवादीला झुकते माप मिळत असल्याने शिंदे गट अस्वस्थ झाल्याचे दिसते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत शिवसेनेच्या आमदारांना समान निधी मिळत नाही, काम होत नाही, नाशिक आणि रायगड जिह्याचे पालकमंत्री पद राष्ट्रवादी आणि भाजप शिवसेनेला देण्यास तयार नाहीत. त्यामुळे काही मनाविरूध्द घडले तर दरे गाव गाठणारे शिंदे यांनी आपली नाराजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मांडली. सुनिल तटकरे यांनी यापूर्वी रायगड जिह्यात हळूहळू शेकापला संपवले, कधी कळले नाही. महाविकास आघाडीत असलेल्या जयंत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत आघाडीचा धर्म न पाळल्याने शेकापच्या जयंत पाटील यांचा शिवसेनेने विधानपरिषदेत पराभव केला.

शेकापचा बालेकिल्ला असणारा रायगड आज पूर्णपणे ढासळला आहे. महाड विधानसभा मतदार संघातील ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादीत तर शेकापचे जयंत पाटील यांचे बंधु पंडीतशेठ पाटील हे भाजपच्या मार्गावर असून, शिवसेना शिंदे गटाच्या महाड आणि अलिबागच्या आमदारांसमोर मोठे आव्हान भविष्यात निर्माण होऊ शकते. त्यामुळे अमित शहा यांचे स्नेहभोजन हे सुनिल तटकरे यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते, यावेळी भरत गोगावले आणि महेंद्र दळवी यांनी गैरहजेरी लावल्याचे बोलले जात आहे. रायगड जिह्यातील राजकारण हे गेली वीस वर्ष तटकरे यांच्याभोवती फिरत राहिले आहे.

शेकापने देखील तटकरे यांच्याशी जुळवुन घेतले मात्र, तटकरे यांच्याशी जुळवुन घेतल्याने शेकापचे मोठे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. आता तटकरे यांना शिंदे गटाचे आमदार उघड उघड विरोध करताना दिसतात, आदिती तटकरे या पुन्हा पालकमंत्री झाल्यास शिंदेंच्या आमदारांना शह देण्याची एकही संधी राष्ट्रवादी सोडणार नाही. त्यामुळे रायगड जिह्याचे पालकमंत्री पद हा कळीचा मुद्दा ठरत आहे. आता अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीनंतर शहा यांनी कोणाच्या बाजुने निर्णय घेतला हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे, मात्र आगामी काळात रायगड जिह्यातील राजकारण हे महायुतीतील धुसफुसीचे केंद्र असणार हे नक्की.

प्रवीण काळे

Advertisement
Tags :

.