For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मित्रानेच करविली बांगलादेशी खासदाराची हत्या

07:00 AM May 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
मित्रानेच करविली बांगलादेशी खासदाराची हत्या
Advertisement

5 कोटी टका इतक्या रकमेची दिली सुपारी : मारेकऱ्यांना पोलिसांकडून अटक

Advertisement

वृत्तसंस्था /कोलकाता

बांगलादेशचे खासदार अनवारुल अजीम अनार यांची कोलकात्यात हत्या करण्यात आली आहे. अनार हे मागील आठवड्यापासून बेपत्ता होते आणि त्यांच्या मोबाइलचा अखेरचा ठावठिकाणा बिहारमध्ये आढळून आला होता. अनार यांच्या हत्येचा दावा बांगलादेशचे गृहमंत्री अजदुज्जमां खान यांनी केला असला तरीही अद्याप त्यांचा मृतदेह आढळून आलेला नाही. खासदाराच्या हत्येमागे बांगलादेशी नागरिकांचाच हात आहे. अनार यांची हत्या त्यांच्याच मित्राने घडवून आणल्याचे बोलले जात आहे. ही एक पूर्वनियोजित हत्या होती. भारतीय पोलीस याप्रकरणी आम्हाला पूर्ण सहकार्य करत आहेत. उर्वरित पैलूही लवकरच समोर येतील असे बांगलादेशच्या गृहमंत्र्यांनी नमूद केले आहे. ढाका पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. तर बंगाल पोलिसांनी एका भारतीय टॅक्सीचालकाला ताब्यात घेतले आहे. मारेकऱ्यांनी खासदाराच्या मृतदेहाचे तुकडे करत ते दोन सुटकेसमध्ये भरले होते. तसेच त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी एका भारतीय व्यक्तीकडे ते सोपविण्यात आले होते. बांगलादेशच्या झेनैदाचे खासदार अनवारुल अजीम हे 12 मे रोजी कोलकात्यात पोहोचले होते, तेथील एका कौटुंबिक मित्राकडे ते वास्तव्यास होते. 13 मे रोजी ते एका डॉक्टरकडे जाणार असल्याचे सांगून घराबाहेर पडले होते. यानंतर ते परतले नव्हते, तर त्यांच्या मोबाइलवरून माझ्याशी संपर्क करण्याची गरज नसल्याचा संदेश कौटुंबिक मित्राला मिळाला होता. बांगलादेशी खासदाराची कोलकात्यात का हत्या करण्यात आली याचे ठोस कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु यामागे सोन्याची तस्करी कारणीभूत असल्याचा संशय व्यक्त होतोय. अनवारुल अजीम आणि बांगलादेशी वंशाचे अमेरिकन नागरिक मोहम्मद अख्तरुज्जमां हे दोघेही मिळून कोलकाता शहरातून सोन्याची तस्करी करत होते. अनवारुल अजीम यांच्या हत्येसाठी 5 कोटी टका इतक्या रकमेची सुपारी देण्यात आली होती असे गुप्तचर यंत्रणांचा दाखला देत बांगलादेशी प्रसारमाध्यमाने म्हटले आहे.

Advertisement

झाले होते भांडण

अनवारुल अजीम आणि  मोहम्मद अख्तरुज्जमां हे दीर्घकाळापासून सोन्याची तस्करी करत होते. परंतु मागील काही काळापासून दोघांमध्ये भांडण सुरू होते. यानंतर अख्तरुज्जमांने अनवारुल अजीम सोबतचे व्यावसायिक संबंध संपुष्टात आणले होते. तसेच त्याने अमानुल्लाह नावाच्या व्यक्तीला खासदार अनवारुल अजीम यांच्या हत्येची सुपारी दिली होती. अमानुल्लाहने हत्येसाठी मुस्तफिजुर आणि फैसल यांची मदत घेतली होती. या दोघांनीच खासदाराची हत्या केली आहे. पोलिसांनी अमानुल्लाहसमवेत या दोघांनाही अटक केली आहे.

कोलकात्यातील फ्लॅटमध्ये मारेकऱ्यांचे वास्तव्य

अख्तरुज्जमांने आणखी दोन जणांची हत्येसाठी मदत घेतली होती. जिहाद आणि सियाम अशी त्यांची नावे होती. हे दोघेही कुठल्याही पासपोर्टशिवाय हत्येकरता भारतात दाखल झाले होते. खासदाराच्या हत्येसाठी मारेकऱ्यांनी कोलकात्यात एक फ्लॅट भाड्याने घेत तेथे वास्तव्य केले होते.

Advertisement
Tags :

.