फुग्याप्रमाणे फुगणारे नाक
कोणत्या वेळी माणसाला कोणता आजार किंवा व्याधी होईल, याचा काही नेम नसतो, असा आपला अनुभव आहे. काहीवेळा देहाच्या किंवा देहाच्या एखाद्या अवयवाच्या या समस्या इतक्या मोठ्या होतात की, काय करावे हेच सुचत नाही. डॉक्टर्सनाही कित्येकदा त्यांचे निदान होत नाही. त्यामुळे अशा समस्या झेलणाऱ्या रुग्णांची कोंडी होते. लोकांना त्यांच्याशी व्यवहार करणेही शक्य होत नाही. ब्रिटनच्या मँचेस्टर येथील एका इयान ऑर्थर नामक व्यक्तीला असाच एक दुर्धर आणि आतापर्यंत अज्ञात असलेला विकार जडला आहे. ऑर्थर हे 64 वर्षांचे आहेत. त्यांनी 32 वर्षे नौदलात सेवा केली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या शरीरावर अचानक वण उठू लागले. डॉक्टरांच्या निदानानुसार त्यांना ‘रोसेन्शिया’ नामक त्वचारोग झाला होता. याच रोगाचा परिणाम म्हणून अचानकपणे त्यांचे नाक फुगू लागले. फुगून ते इतके मोठे झाले की लोकांना त्यांची किळस येऊ लागली. लोक त्यांना टाळू लागले. त्यांच्या रोगावर उपचार तर होत होते, पण नाकाचा फुगा मात्र कमी होत नव्हता. शस्त्रक्रियाही करण्यात आली. पण शस्त्रक्रियेनंतर नाक पुन्हा मोठे होऊ लागले होते. 2022 पासून ऑर्थर यांनी आपल्या घरातून बाहेर पडणेच बंद केले आहे. अगदी घराबाहेर पडायचीच वेळ आली तर ते अगदी पहाटे किंवा रात्री उशीरा लोकांची गर्दी कमी झाल्यानंतर बाहेर पडतात. अलिकडे त्यांच्यावर लेझर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.