For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नाराजी दूर करण्यासाठी कसरत

06:00 AM Aug 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
नाराजी दूर करण्यासाठी कसरत
Advertisement

मुख्यमंत्री, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे नाराज आमदारांशी चर्चा : सुरजेवाला बेंगळुरात

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेंगळूर :

Advertisement

राज्य मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेस पक्षात नाराज आमदारांनी पुढील राजकीय भवितव्याबाबत विचारविमर्श करण्यास प्रारंभ केला आहे. दरम्यान, मंत्रिपदापासून वंचित राहिलेल्या नाराज आमदारांची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांनी पुढाकार घेतला आहे. नाराज झालेल्या आमदारांशी चर्चा सुरू केली आहे. याचवेळी, राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला देखील बुधवारी बेंगळूरला आले असून त्यांनीही आमदारांशी  चर्चा केली.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर गेल्या तीन दिवसांपासून राज्य काँग्रेसमध्ये नाराजीनाट्या सुरू झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांनी मंत्रिपद हुकल्याने नाराज झालेल्या आमदारांना बोलावून समजूत काढण्याचे प्रयत्न चालविले आहेत. उभय नेत्यांशी चर्चेनंतर बहुतांश नाराज आमदारांचे समाधान झाले. त्यात इंडीचे आमदार यशवंतरायगौडा पाटील यांचाही समावेश आहे. तथापि, काही ज्येष्ठ आमदारांची नाराजी कायम आहे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचे निर्देश हायकमांडने दिले. त्यानुसार, राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला बुधवारी बेंगळूरला आले. त्यांनी नाराज आमदारांशी चर्चा करून, परिस्थितीची जाणीव करून दिली.

माजी मंत्री दिनेश गुंडूराव यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. त्याचप्रमाणे, मंत्री चेलुवरायस्वामी आणि मंत्री एच. सी. बालकृष्ण यांना मुख्यमंत्र्यांनी आमदार एम. कृष्णप्पा यांच्या निवासस्थानी पाठवून असंतोष शमवण्याचा प्रयत्न केला.

मुख्यमंत्र्यांप्रमाणेच प्रदेशाध्यक्ष हरिप्रसाद यांनीही बुधवारपासून मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असणारे आमदार एस. एन. नारायणस्वामी, बेळूर गोपालकृष्ण  यांना आपल्या निवासस्थानी बोलावून त्यांच्याशी चर्चा करत नाराजी दूर केली. अनेक आमदारांशी त्यांनी फोनवर संवाद साधून पक्षाच्या हितासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

नूतन मंत्र्यांकडूनही प्रयत्न

मुख्यमंत्री डी. के. शिवकमार यांनी आमदार यशवंतरायगौडा पाटील यांच्याशी फोनवर संवाद साधला तसेच त्यांना राजीनामा मागे घेण्याची सूचना केली. त्यानुसार यशवंतरायगौडा यांनी विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांना पत्र पाठवून आपला राजीनामा स्वीकारू नये, अशी विनंती केली आहे.

मंत्री लक्ष्मण सवदी, आमदार विनय कुलकर्णी आणि महांतेश कौजलगी यांनीही राजीनामा दिलेल्या यशवंतरायगौडा पाटील यांच्याशी चर्चा करून राजीनामा मागे घेण्याची विनंती केली.

बंगारपेठचे आमदार एस. एन. नारायणस्वामी आणि चिंतामणीचे डॉ. एम. सी. सुधाकर यांचा असंतोष शमवण्याचे प्रयत्न करण्यात आले. उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्यावर कोलार जिल्ह्यातील नाराज आमदारांची समजूत काढण्याची  जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

सर्व काही ठीक होईल: टी. बी. जयचंद्र

मंत्रिमंडळा विस्तारावेळी असंतोष निर्माण निर्माण होणे स्वाभाविक आहे. या सरकारमधील हा शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार आहे. त्यामुळे इच्छुकांची यादी मोठी होती. प्रत्येकाला मंत्रिपद हवे असणे स्वाभाविक आहे. मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. राज्य काँग्रेस प्रभारी सुरजेवाला नाराज आमदारांशी चर्चा करतील. त्यानंतर सर्व काही ठीक होईल, असे काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आणि राज्य सरकारचे दिल्लीतील प्रतिनिधी टी. बी. जयचंद्र यांनी म्हटले आहे

Advertisement
Tags :

.