नाचता येईना अंगण वाकडे!
निवडणूक आयोगाला त्याच्या खुर्चीवरून खाली खेचण्याचा उद्देश ठेवून काँग्रेस पक्षाने देशभरात जोरदार आंदोलन केले खरे परंतु देशभरातील चार राज्यांमधील सुशिक्षित शिक्षक वर्गांच्या विधान परिषदांच्या 28 रिक्त जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला जबरदस्त धक्का बसला. एकही जागा काँग्रेसला मिळू नये, हे खरेतर त्या पक्षासाठी गंभीरपणे विचार करायला लावणारी ही घटना म्हणावी लागेल.
देशात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणा ही काँग्रेसच्या राजवटीत सुरू झाली होती मात्र अलीकडे बदलत्या काळामध्ये, काँग्रेसच्या एकंदरीत कारभाराला कंटाळून मतदार राजाने भारतीय जनता पक्ष व इतर काही पक्षांच्या बाजूने दिलेला कौल लक्षात घेता, काँग्रेसने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेला जोरदार विरोध करायला प्रारंभ केला. त्यामुळे ज्या भागात या यंत्रणेचा वापर केला नाही व शिक्के मारून मतदान करण्यात आले, त्या ठिकाणी देखील गेल्या चार-पाच महिन्यात काँग्रेसला आलेले अपयश, हे काँग्रेसने पुन्हा निवडणूक आयोगावर पाडलेले खापर आहे. ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी आपल्याकडे म्हण आहे. ती म्हण काँग्रेस नेते राहुल गांधी यांना बरोबर जुळून येते. दोन दिवसांपूर्वी चार राज्यांमधील विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुका घेण्यात आल्या. हे मतदान देखील शिक्के मारून झाले. इथे इलेक्ट्रॉनिक यंत्रणेचा वापर मुळीच करण्यात आला नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना आता निवडणूक निकाल आपल्या बाजूने लागेल, असे वाटले आणि त्या आनंदात काँग्रेसचे नेते होते. मात्र चारही राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाला एकही जागा मिळू नये, हा कसला योग आहे, हे खुद्द राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी तपासण्याची गरज आहे. ज्या चार राज्यांमध्ये विधान परिषदेच्या 28 जागांसाठी आणि ते देखील शिक्षक वर्गासाठी या निवडणुका होत्या, चांगले सुशिक्षित, सुसंस्कारित शिक्षक त्याला मतदान करतात. या सुशिक्षितांनी एकाही काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणू नये, हे काँग्रेससाठी दुर्दैव ठरावे. या चार राज्यांपैकी कर्नाटक हे राज्य काँग्रेसकडे आहे आणि त्या ठिकाणी काँग्रेसचे चारही उमेदवार पराभूत होणे, हे काँग्रेससाठी आणि पक्षाच्या भविष्यासाठी फार धोकादायक ठरावे. यामुळे काँग्रेसने जरूर विचार करावा. सुशिक्षित वर्ग हा आपल्या बाजूला राहिलेला नाही, हे या पक्षाच्या नेत्यांनी विचारात घेणे गरजेचे आहे. पक्षाने आपली रणनीती बदलली नाही तर जनता या पक्षाबरोबर राहणार नाही. काँग्रेससाठी कर्नाटक राज्यात विधान परिषदेच्या चारपैकी चारही जागा गमावण्यासारखी दुसरी धक्कादायक बाब नाही. जनतेचा कौल हा बदलतोय. तेव्हा काँग्रेससाठी धोकादायक घंटा विधान परिषदेच्या निमित्ताने वाजलेली आहे. इतर तीन राज्यांचा विचार सोडून दिला, त्या ठिकाणी उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रात भाजपची सरकारे आहेत व काँग्रेसकडे कर्नाटक राज्य आहे. अशावेळी कर्नाटकात काँग्रेस विरोधात शिक्षक वर्ग मतदान करतो, याचा अर्थ सुशिक्षित वर्ग काँग्रेसपासून फारकत घेत आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेसला कदाचित त्याचे परिणामही जाणवू शकतात. कर्नाटकात काँग्रेसचे डॅशिंग मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार एकापेक्षा एक बेधडक निर्णय घेण्यात प्रसिद्ध आहेत. मात्र कर्नाटकात काँग्रेस पक्षामध्ये जे दोन गट सक्रिय आहेत, त्याचा हा परिणाम काँग्रेसला भोगावा लागला आहे. चारपैकी तीन जागा भाजपने आणि भाजपचा सहकारी असलेल्या जनता दल (एस) या पक्षाला एक जागा मिळावी व काँग्रेस पक्षाला भोपळादेखील फोडता आला नाही, हे काँग्रेसला विचार करायला लावणारी महत्त्वपूर्ण राजकीय घटना आहे. इतर राज्यांमध्ये काँग्रेसने निवडणूक आयोग, केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जी आंदोलने चालविली, त्याचा जनतेवर विशेषत: सुशिक्षित वर्गावर कोणताही परिणाम झालेला नाही, हे या निवडणुकीतून स्पष्ट होते. निवडणुकीमध्ये या केवळ 28 जागा आहेत. त्याचा फार मोठा गंभीर परिणाम होत नाही परंतु कर्नाटकामध्ये मात्र काँग्रेसचे राज्य असल्यामुळे त्याचा परिणाम निश्चितच होईल. तरीदेखील काँग्रेसने या सुशिक्षित वर्गाच्या निवाड्यावर गंभीरपणे विचार केला पाहिजे. 28 पैकी एकही जागेवर पक्षाला यश मिळू नये, याची कारणे शोधून काढावीत. निवडणूक आयोगामुळे या जागा मिळाल्या नाहीत, हा गैरसमज निर्माण करण्यात काँग्रेसला कदाचित यश मिळू शकते परंतु जनतेचा सहानुभूतीपूर्वक पाठिंबा नाही, हे या निवडणूक निकालावरून स्पष्ट होते. याचा देशातील राजकारणावर फारसा गंभीर परिणाम होत नाही मात्र कर्नाटक राज्याच्या राजकारणावर निश्चितच होईल. कारण सत्ताधारी काँग्रेस पक्षातील माजी मुख्यमंत्र्याचा गट आहे, तो आता उघडपणे डी. के. शिवकुमार यांच्यावर हल्लाबोल करू शकतो. कर्नाटक बाजूला ठेवले तरीदेखील इतर तीन राज्यांमध्ये एकही जागा मिळू नये, हे कशाचे द्योतक आहे, याचा विचार काँग्रेसने जरूर करावा. केवळ निवडणूक आयोगावर आपल्या अपयशाचे खापर फोडून काहीही उपयोग होणार नाही, हेच त्यातून सिद्ध होते.
