For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खोल समुद्रात 7 हजार वर्षे जुनी भिंत

06:19 AM Jan 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
खोल समुद्रात 7 हजार वर्षे जुनी भिंत
Advertisement

ख्रिस्तपूर्व 5800 सालामधील रहस्य

Advertisement

फ्रान्सच्या पश्चिम किनाऱ्यानजीक समुद्राखाली एक चकित करणारा शोध लागला आहे. येथे पाणबुड्यांना एक लांब दगडी भिंत आणि त्याच्या आसपास अनेक मानवाकडून निर्मित संरचना आढळून आल्या आहेत. वैज्ञानिकांनुसार या संरचना सुमारे 7 हजार वर्षे जुन्या आहेत. हा शोध ब्रिटनी भागातील इल दे सेन बेटानजीक लागला आहे. सर्वात मोठी भिंत सुमारे 120 मीटर लांब असून याच्या आसपास त्याच काळातील सुमारे 12 छोट्या संरचनाही आढळून आल्या आहेत.

निवृत्त भूवैज्ञानिक इव्स फूके समुद्राच्या पृष्ठभागाखालील भागाचे नकाशे पाहत होते. हे नकाशे लेझर तंत्रज्ञानाने तयार करण्यात आले होते. याच नकाशांमध्ये त्यांना काही अशा आकृत्या दिसल्या, ज्या नैसर्गिक वाटत नव्हत्या. यानंतर वैज्ञानिकांच्या टीमने या ठिकाणी काम सुरू केले. 2022 पासून 2024 पर्यंत पाणबुड्यांनी  अनेकदा समुद्रात उतरून या भागाची तपासणी केली. तपासणीनंतर या संरचना ग्रेनाइट दगडांनी तयार करण्यात आल्या होत्या हे स्पष्ट झाले.

Advertisement

 वैज्ञानिकही चकित

अत्यंत प्रतिकूल सागरी वातावरणानंतरही या संरचना बऱ्याचअंशी सुरक्षित मिळाल्याने वैज्ञानिकही चकित झाले आहेत. समुद्राचा वेगवान लाटा आणि खारे पाणी सर्वसाधारणपणे दगडांनाही नुकसान पोहोचविते, तरीही या संरचना अत्यंत चांगल्या अवस्थेत मिळणे पुरातत्वतज्ञांसाठी मोठी बाब आहे. युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ब्रिटनीचे पुरातत्व प्राध्यापक इवान पायेर यांनी हा शोध अंडरवॉटर आर्कियोलॉजीसाठी नवे मार्ग खुले करत असल्याचे म्हणत यामुळे हजारो वर्षांपूर्वी समुद्र किनारी राहणारे लोक कशाप्रकारे जगत होते हे समजून घेण्यास मदत होणार असल्याचे नमूद पेले आहे.

समुद्राची पातळी होती कमी

शोधानुसार या संरचना सुमारे 5800 ते 5300 ख्रिस्तपूर्व काळादरम्यान निर्माण करण्यात आल्या होत्या. तर आताच्या समुद्राच्या पृष्ठभागापेक्षा हे सुमारे 9 मीटर खाली आहे. परंतु जेव्हा त्यांची निर्मिती करण्यात आली होती, तेव्हा समुद्राचे पाणी आजच्या तुलनेत खूपच खाली होते. त्या काळात हा भाग बहुधा समुद्र किनाऱ्री राहिला असेल, जेथे लोक राहायचे आणि काम करायचे.

भिंत निर्मितीचा उद्देश

या भिंती मासेमारीला मदत व्हावी म्हणून निर्माण करण्यात आल्या असाव्यात असे वैज्ञानिकांचे मानणे आहे. तसेच समुद्राच्या वाढत्या पातळीपासून स्वत:ला वाचविण्यासाठी त्यांची निर्मिती करण्यात आली असण्याचीही शक्यता आहे.

तत्कालीन तंत्रज्ञान अन् समाजाची झलक

या शोधामुळे त्या काळातील लोकांकडे तंत्रज्ञानाची चांगली समज होते असे कळते. अनेक दगड अनेक टन वजनी आहेत, इतक्या अवजड दगडांना कापणे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे आणि मग योग्यपद्धतीने त्यांना एका वर एक असे रचणे सोपे काम नाही. याचा अर्थ त्या काळातील समाज संघटित राहिला असावा आणि लोक मिळून मोठी कामे करत असावेत. अशाप्रकारची तांत्रिक माहिती फ्रान्समध्ये मिळणाऱ्या मोठ्या दगडांच्या स्मारकापेक्षाही शेकडो वर्षे जुनी असू शकते असे शोधात म्हटले गेले आहे. म्हणजेच माणसाने मोठ्या दगडांद्वारे निर्मिती करणे अत्यंत आधीच शिकले होते.

Advertisement
Tags :

.