एक मैत्री 62 वर्षाची !
कोल्हापूर / सुधाकर काशीद :
त्याचं नाव जालंदर आणि त्याचं नाव विश्वनाथ. दोघेही करवीर तालुक्यातल्या शिरोली दुमाला गावचे, दोघे जानी दोस्त. दोस्ती अगदी लहानपणापासूनची. दोघांची जन्मतारीख एक. दोघांची शाळा एक. दोघांचा अभ्यास एकत्र. दोघेही नोकरीला एकाच दिवशी लागले. दोघांची घरे अगदी एकसारखी. दोघांचा पगार एक. दोघांना प्रमोशन मिळाले तेही एकाच दिवशी. दोघांनी घरे बांधली, तीही अगदी एकसारखी. दोघांची मोटारसायकल एकसारखी आणि दोघांनी सेवानिवृत्ती स्वीकारली तीही एकाच दिवशी. निवृत्तीनंतरही हे दोघेजण आज एकत्र आहेत.
या दोन मित्रांच्या मैत्रीची ही कथा खूप वेगळी आहे. एखाद्या चित्रपटाला शोभणारी आहे. गेली 62 वर्ष हे दोघे मैत्रीचा धागा टिकवून आहेत आणि हळूहळू हा धागा आणखी घट्ट करत चालले आहेत. एका आदर्श मैत्रीचे प्रतीक म्हणून त्यांची ही मैत्री करवीर तालुक्यात ओळखली जात आहे.
जालंदर आणि विश्वनाथ यांच्या या मैत्रीचा प्रवास खूप विलक्षण आहे. शिरोली दुमाला येथील मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. दोघांची घरे अवघ्या 20-25 पंचवीस पावलावर. जसे समजू लागले तेव्हापासून दोघे खेळायला एकत्र. दोघेही शिरोली दुमाला येथील विद्यामंदिर शाळेत शिकायलाही एकत्र. नक्कीच शाळकरी मित्रांच्या अशा अनेक जोड्या असू शकतात. पण या ना त्या कारणाने त्यांना लांब जावे लागते. पण जालंदर आणि विश्वनाथ यांच्या मैत्रीचा धागा दिवसागणिक गुंततच राहिला.
दोघेही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून मुलाखतीला गेले आणि दोघांचीही निवड झाली. त्यामुळे दोघांच्या नोकरीचा दिवस एकच राहिला. दोघांची नियुक्ती कोकणात मंडणगड गावी झाली. त्यांच्या शाळा वेगवेगळ्dया. पण दोघेही मंडणगडमध्येच शिक्षक म्हणून नोकरीला लागले. मंडणगडला खोली घेऊन एकत्रित राहिले. जेवण स्वत: करून खाऊ लागले. दोघे मिळून भांडी घासू लागले. दोघेही विद्यार्थीप्रिय. त्यांची अशी मैत्री पाहून त्यांना गावातले लोक राम-लक्ष्मण म्हणूनच ओळखू लागले. दोघांच्या नोकरीत नियुक्तीचा दिवस एकच, त्यामुळे प्रमोशनही एकाच दिवशी त्यांना मिळाले. दोघेही मुख्याध्यापक झाले.
दोघांच्या लग्नाचा क्षण मात्र वेगवेगळा. दोघांच्याही लग्नाच्या तारखेत अवघ्या 15 ते 20 दिवसाचा फरक राहिला. पण त्यांनी मैत्री अशी टिकवली, की एकमेकांच्या घरात काही खाद्यपदार्थ आणायचे ठरवले तर केवळ आपल्या एका कुटुंबासाठी न घेता एकमेकांच्या कुटुंबासाठीही ते खाऊ घेऊ लागले. दोघांच्या सणासुदीला घेतलेल्या कपड्याचे रंगही एकसारखेच राहिले. कोरोना काळात या दोघांच्या मैत्रीचा कस लागला. दोघांनाही कोरोना झाला, पण दोघांनीही एकमेकाला आधार दिला. त्यांच्या या मैत्रीचा धागा त्याच्या कुटुंबातही गुंतला गेला आहे. आज दोघेही निवृत्तीचे जीवन उपभोगत आहेत. अजूनही एखाद्या सोळा वर्षाच्या मुलाइतके ते आपली मैत्री जपत आहेत. दोघांचेही कुटुंब पर्यटनासाठी एकत्र जात आहेत. दोघांनी एकमेकासाठी इतके काही केले आहे, की त्याचा हिशोब करणे त्या दोघांनाही अशक्य आहे आणि मैत्रीत हिशोब हा शब्दच त्यांना अमान्य आहे.
- आपलंच खरं, असे कधीही नाही
आपलंच खरं असं समजत गेलं, की मैत्री टिकत नाही. एकमेकासाठी एखाद्या मुद्यावर, एखाद्या विषयावर एखादं पाऊल मागे घेतले तर काही बिघडत नाही आणि अशा भावनेनेच आम्ही मैत्री जपली आहे.
- जालंदर कांबळे,
-विश्वनाथ कांबळे
- एक आस्तिक दुसरा नास्तिक!
दोघांपैकी एक अस्तिक आणि दुसरा नास्तिक. पण त्यांनी कधीही एकमेकांच्या भावनेला दुखावेल, अशी टोकाची चर्चा कधीच केली नाही किंवा त्यांनी कधी वादाचा मुद्दाही केला नाही. मैत्रीत जात-पात, अस्तिक नास्तिकचा मुद्दा कधीही आड आला नाही.
या दोघांचा मच्छिंद्र म्हणून आणखी एक चांगला मित्र होता. पण त्याने जिल्हा बदली करून घेतली. त्यानंतर तो गावचा सरपंच झाला. राजकारणात गेला, त्यामुळे मैत्रीत थोडा खंड पडला.