For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेत 5 वर्षीय मुलाला घेतले ताब्यात

06:33 AM Jan 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेत 5 वर्षीय मुलाला घेतले ताब्यात
Advertisement

शाळेतून परतताना वाहनातून उतरविले : मग पित्याला अटक

Advertisement

वृत्तसंस्था/वॉशिंग्टन  

अमेरिकेच्या मिनेसोटा प्रांताच्या कोलंबिया हाइट्समध्ये इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (आयसीई) एजंट्संनी 5 वर्षीय मुलगा लियाम कोनेजो रामोसला पित्यासोबत ताब्यात घेतले आहे. दोघांनाही टेक्सासच्या इमिग्रेशन डिटेंशन सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे.

Advertisement

एजंट्सनी धावत्या वाहनातून मुलाला उतरविले, मग त्यांनी त्याला घराचे दार ठोठावण्यास सांगितले होते अशी माहिती लियामच्या शाळेच्या पर्यवेक्षिका जेना स्टेनविक यांनी दिली. तर अटकेच्या भीतीने लियामच्या वडिलांनी स्वत:च्या पत्नीला दरवाजा न उघडण्याची सूचना केली. परंतु काही वेळानंतर आईवडिलांनी स्वत:च्या मुलाला घरात आणण्याच्या उद्देशाने दरवाजा उघडला असता बाहेर उपस्थित एजंट्सनी त्वरित लियामच्या पित्याला अटक केली. तर मुलाला घरात असलेल्या इतर लोकांकडे सोपविण्यास नकार देत त्यालाही स्वत:सोबत नेले.

मुलाला केवळ ताब्यात घेण्यात आले असून अटक करण्यात आलेले नाही. एजंट्स मुलाला थंडीच्या वातावरणात बाहेर सोडू शकत नव्हते आणि अवैध स्थलांतरिताला अटक करणे आवश्यक असल्याचे वक्तव्य अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांनी केले आहे.

6 आठवड्यांमध्ये 3 हजार जणांना अटक

लियामच्या शाळेत शिकत असलेल्या चार विद्यार्थ्यांना आतापर्यंत आयसीईने ताब्यात घेतले आहे. लियामचा परिवार 2024 मध्ये इक्वेडोरमधून अमेरिकेत दाखल झाला होता. त्यांच्यावर अवैध स्थलांतराप्रकरणी खटला सुरू असला तरीही देश सोडण्याचा आदेश देण्यात आला नव्हता. मागील 6 आठवड्यांमध्ये मिनेसोटा प्रांतात 3 हजार जणंना अवैध स्थलांतराप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तर आतापर्यंत 400 मुलांना यंत्रणेने ताब्यात घेतले आहे.

सुरक्षेसाठी मुलाला सोबत घेतले

पित्याने लियामला स्वत:सोबत ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार पिता आणि मुलगा दोघेही टेक्सासच्या डिली येथील इमिग्रेशन डिटेंशन सेंटरमध्ये  एकत्र असल्याची माहिती होमलँड सिक्युरिटीच्या प्रवक्त्या ट्रिशिया मॅकलॉफलिन यांनी सांगितले आहे. आयसीईने मुलाला लक्ष्य केले नव्हते, तर त्याचे वडिल एड्रियन  अलेक्जेंडर कोनेजो एरियासला अटक करण्यात येत होती. मुलाच्या सुरक्षेसाठी एक एजंट त्याच्यासोबत थांबला होता. स्वत:च्या मुलांसोबत डिपोर्ट होण्याची किंवा मुलांना स्वत:च्या पसंतीच्या एखाद्या व्यक्तीच्या स्वाधीन करण्याचा पर्याय आईवडिलंना दिला जात असल्याचे आयसीईने सांगितले आहे.

कमला हॅरिस यांच्याकडून टीका

लियाम केवळ एक मुलगा असून त्याने स्वत:च्या परिवारासोबत घरी असायला हवे, इमिग्रेशन एजेन्सीच्या सेंटरमध्ये नव्हे. एजेन्सी एका मुलाला चोराप्रमाणे वागवत असल्याची टीका अमेरिकेच्या माजी उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी केली आहे.

Advertisement
Tags :

.