मुंबई-गोवा महामार्गावर काळाचा घाला !
कार २५ फूट दरीत कोसळून ४ वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी अंत; इन्सुली येथील भीषण अपघात
प्रतिनिधी
बांदा
मुंबई- गोवा महामार्गावरील इन्सुली खामदेव नाका येथे मंगळवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास कार पंचवीस फूट गटारात कोसळल्याने चार वर्षीय बालकाचा दुर्दैवी अंत झाला. कु. शौर्य सचिन तुयेकर ( रा. सावंतवाडी, तिलारी कॉलनी ) असे त्या बालकाचे नाव आहे. इन्सुली हुन सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. अपघातात चारवर्षीय शौर्य गाडीच्या बाहेर फेकला गेला व गाडी त्याच्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर त्याला बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांनी त्याला मृत घोषित केले. अपघाताचे वृत्त समजताच नातेवाईकानी बांदा येथे गर्दी केली होती. मृत शौर्य याचे वडील सचिन तुयेकर हे तिलारी पाटबंधारे विभागात चालक म्हणून कार्यरत आहेत. तिलारीचे अभियंता बी .व्ही जाधव यांनी बांदा येथे सकाळी भेट दिली. ब्रिजचे काम चालू असल्याने तसेच तेथे सूचना फलक न लावल्याने हा अपघात झाल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले.