25 लाखांचा हौद कचऱ्यात
कळंबा / सागर पाटील :
कळंबा तलावाच्या साडेसात कोटींच्या सुशोभीकरणाच्या कामांतर्गत तलाव प्रदूषणमुक्त ठेवण्याच्या उद्देशाने पंचवीस लाख रुपये खर्चून उभारलेल्या जनावरे धुण्याच्या हौदाचा सध्या दुरुपयोग होत आहे. हा हौद कचराव्यवस्थेच्या ठिकाणी रुपांतरित झाला आहे. महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे आणि देखरेखीअभावी या हौदाचा मूळ हेतू पूर्णपणे हरवला आहे.
- या हौदाचा उद्देश आणि प्रत्यक्ष उपयोगात फरक
तलावाचे पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून या ठिकाणी हौदाच्या उभारणीसह जनावरांना पाणी आणि धुण्यासाठी हा विशेष शेड 25 लाख खर्च करून उभारला होती. जनावरे तलावात न धुता या शेडमध्ये धुण्याची सोय केली होती. सुरुवातीला काही काळ गावकऱ्यांनी याचा उपयोग केला. मात्र, काळाच्या ओघात या हौदाकडे दुर्लक्ष झाले आणि आज हाच हौद मद्यपींनी रात्रीच्या वेळी पार्टी करण्यासाठी वापरायला सुरुवात केली आहे. सध्या स्थितीला या ठिकाणी महिला या ठिकाणी कचऱ्याची पोती ठेवू लागल्या असून, या शेडमध्ये दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरली आहे.
- निविदाधारकांचा उद्देश अपूर्णच
सुशोभीकरणावेळी या प्रकल्पात दोन बोअरवेल्स मारल्या होत्या. एका बोअरचे पाणी जनावरे धुण्यासाठी तयार केलेल्या हौदात तर दुसऱ्याचे पाणी परिसरातील चार हजार वृक्षांच्या सिंचनासाठी वापरण्यात येत होते. ही व्यवस्था सुरु ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने देखरेखीची जबाबदारी घ्यायला हवी होती, मात्र ती घेतली गेली नाही. कळंबा तलावाला सध्या निधीतून सुशोभीकरण सुरू असूनही काही नागरिक तलावात जनावरे पुन्हा धुतली जात असल्याने पाण्याचे प्रदूषण वाढत आहे. कळंबा तलाव हे उपनगरातील तसेच लगतच्या गावातील नागरिकांचे पिण्याचे पाण्याचे महत्त्वाचे स्रोत आहे. तरीही त्याच्या स्वच्छतेसाठी कोणतेही ठोस उपाय प्रशासनाने योजलेले नाहीत. प्रशासनाची अनास्था यामुळे दिसून येत आहे. तसेच तलाव क्षेत्रात सुरक्षा रक्षक किंवा पर्यवेक्षक नेमलेले नाहीत. त्यामुळे जवळपास वीस एकर जागेवर तलाव परिसरात अतिक्रमण झाले आहे. तलाव परिसर आता प्रेमीयुगलांचे बैठकीचे ठिकाण, मद्यपींचा अड्डा आणि कचऱ्याचा ढिगारा झाला आहे. तसेच ग्रामपंचायत आणि महापालिकेने साफ दुर्लक्ष केले आहे.
- देखभाल आवश्यक
प्रशासनाने एवढा मोठा निधी वापरून सुविधा निर्माण केली, पण त्याचा योग्य वापरच होत नाही. तलावातील पाणी पिण्यासाठी वापरात असून काही नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तलावाच्या संरक्षणासाठी सुरक्षा यंत्रणा, स्वच्छता मोहीम, आणि जागरूकता अभियान राबवण्याची गरज आहे.
- संग्राम जाधव, ग्रामस्थ कळंबा
- तातडीने कारवाई करणे आवश्यक
कळंबा तलावासारख्या महत्त्वाच्या जलस्रोताचे रक्षण करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. सुशोभीकरणाच्या नावाखाली केवळ निधी खर्च करून उपयोग होत नसेल, तर ते अपयशच म्हणावे लागेल. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या या प्रश्नावर तातडीने कारवाई करणे आवश्यक असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.