For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

औषधांच्या किंमतीतही 20 टक्क्यांनी वाढ

06:15 AM May 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
औषधांच्या किंमतीतही 20 टक्क्यांनी वाढ
Advertisement

कर्नाटक फार्मा मेडिकल असोसिएशनची माहिती : पेट्रोल-डिझेलनंतर सर्वसामान्यांना आणखी एक धक्का

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेंगळूर

Advertisement

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाचे जागतिक परिणाम आता भारतातील सामान्य माणसाच्या खिशावर थेट परिणाम करत आहेत. इंधन आणि खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींबरोबरच जीवनरक्षक औषधांच्या किमतीही गगनाला भिडत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. कर्नाटक फार्मा मेडिकल असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार बाजारात येणाऱ्या औषधांच्या नवीन बॅचच्या किमती सरासरी 15 ते 20 टक्क्मयांनी वाढल्या आहेत.

युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. हेच या दरवाढीचे मुख्य कारण आहे. औषधी गोळ्या आणि सिरपच्या निर्मितीसाठी पेट्रोकेमिकल्स हा एक अत्यावश्यक कच्चा माल आहे. परंतु मध्यपूर्वेतील संकटामुळे कच्चे तेल आणि पेट्रोकेमिकल्स आयात करण्याचा खर्च महाग झाला आहे. वाहतुकीचा वाढलेला वेळ आणि खर्च यामुळे औषध कंपन्या अपरिहार्यपणे औषधांच्या नवीन बॅचच्या किमती टप्प्याटप्प्याने वाढवत आहेत.

ही दरवाढ केवळ सामान्य आजारांपुरती मर्यादित नाही. दररोजच्या वापरातील रक्तदाब, मधुमेह, हृदयरोगावरील औषधे, पोटाच्या गोळ्या, कफ सिरप, आयर्न टॉनिक आणि तापासाठी वापरले जाणारे पॅरासिटामॉल यांसारख्या 600 हून अधिक अत्यावश्यक औषधांच्या किमती गुपचूप वाढत आहेत. दररोज गोळ्यांवर अवलंबून असणाऱ्या वृद्ध आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी हा एक असह्या धक्का मानला जात आहे.

प्रत्येक कुटुंबाच्या मासिक बजेटवर परिणाम

औषधांसोबतच दैनंदिन वापरातील सौंदर्यप्रसाधने आणि लहान मुलांच्या उत्पादनांच्या किमतींमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. बेबी पावडर, साबण, लोशन आणि क्रीमच्या किमतीही ग्राहकांना धक्का देत आहेत. या जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीने प्रत्येक कुटुंबाचे मासिक बजेट हादरवून टाकले आहे.

सार्वजनिक क्षेत्रात चिंता वाढली

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सध्या तरी दरवाढीची लक्षणे थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. जोपर्यंत मध्य-पूर्वेतील युद्धाची परिस्थिती निवळत नाही आणि जागतिक बाजारपेठ व पुरवठा व्यवस्था सामान्य होत नाही, तोपर्यंत ही दरवाढीची प्रक्रिया अव्याहतपणे सुरू राहील, असे कर्नाटक फार्मा मेडिकल असोसिएशनने स्पष्ट केले आहे. यामुळे सार्वजनिक क्षेत्रात आणखी चिंता वाढली आहे.

Advertisement
Tags :

.