2 हजार वर्षे जुना कचऱ्याचा डोंगर असणारे शहर
जगातील सर्वात सुंदर शहरांमध्ये रोमची गणना होते. येथे अनेक ऐतिहासिक स्मारके असून ती पाहण्यासाठी लाखो लोक येत असतात. परंतु या शहरात एक असा पर्वत आहे, जो या शहराच्या सुंदरतेवर डाग असल्याप्रमाणे आहे. येथे 2000 वर्षांपेक्षा जुना कचऱ्याचा डोंगर आहे. दिल्ली आणि मुंबईतील कचऱ्याचे अवाढव्य ढिग तुम्ही पाहिले असतील, परंतु रोममधील हा डोंगर पाहून तुम्ही चकित व्हाल.
रोमच्या होरिया गॅलबे या भागानजीक टायबर नदीपासून काही अंतरावरच एक छोटासा डोंगर असून त्यावर गवत आणि झाडे आहेत. दूरून पाहिल्यास तुम्हाला साधारण डोंगर वाटेल, परंतु प्रत्यक्षात हे एक प्राचीन लँडफिल म्हणजेच कचरा फेकण्याचे ठिकाण आहे. प्राचीन रोममध्ये येथे कचरा फेकला जात होता, याचमुळे याला जुन्या काळातील सर्वात मोठे डंपिंग ग्राउंड देखील मानले जाते.
हा डोंगर रुंदीत सुमारे 1 किलोमीटरपर्यंत फैलावलेला आहे. याचा बेस 20 हजार चौरस मीटरमध्ये असून हा 35 मीटर म्हणजेच 100 मीटरपेक्षा अधिक उंच आहे. जुन्या काळात येथे लोक एमफोरा फेकत होते. हे सेरामिकद्वारे निर्माण करण्यात आलेले एक प्रकारचे जार असायचे, ज्यात लोक ऑलिव्ह ऑइल भरून ठेवायचे. या डोंगराला मॉन्टे टेस्टासिओ या नावाने देखील ओळखले जाते. येथे 5 कोटीहून अधिक जारचे तुकडे आहेत, जे जमा होत होत डोंगरात रुपांतरित झाले आहेत.
या ठिकाणी फिरण्यासाठी अनुमती घ्यावी लागते. आत जाण्यासाटी 370 रुपयांचे तिकीट खरेदी करावे लागते. जुन्या काळात या बरण्यांमध्ये तेलासोबत अन्य प्रकारची सामग्रीही साठविली जात होती. या बरण्यांच्या निर्मितीचा खर्च देखील अत्यंत कमी असायचा. या बरण्यांचा वापर थांबल्यावर लोक या ठिकाणी त्या फेकून देत होते. याचमुळे या ठिकाणाने डोंगराचे स्वरुप धारण केले आहे.