झाडाने घेतला युवतीचा बळी
पणजी महानगरपालिका उद्यानजवळ चर्च चौकातील घटना
पणजी : पणजी येथील चर्च चौक परिसरातील महानगरपालिका उद्यानाच्या बाजूला असलेला वृक्ष उन्मळून पडला. त्यात एक 19 वर्षीय युवती सापडून ठार झाली. ही घटना रविवारी सकाळी 11 वा. च्या सुमारास घडली. युवती उद्यानाच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरून चालत जात असताना अचानक झाड कोसळल्याने तिला जीव गमवावा लागला. मृत झालेल्या युवतीचे नाव आरती गोंड (वय 19) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदर युवती रमानगर बेती येथे आपल्या कुटुंबासमवेत राहत होती तर पणजी येथे एका खासगी आस्थापनात नोकरी करीत होती. काल रविवारी ती कामावर आली होती. सकाळी 11 वा.च्या सुमारास ती रस्त्यावरून चालत जात असताना अचानक भलेमोठे झाड तिच्यावर कोसळले. अग्निशामक दलाला घटनेची माहिती मिळताच ते त्वरित घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी झाड कापून युवतीला बाहेर काढले. 108 ऊग्णवाहिकेच्या साहाय्याने गंभीर जखमी युवतीला गोमेकॉत पाठविण्यात आले. डॉक्टरांकडून उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. दरम्यान, झाड रस्त्यावर कोसळल्यामुळे वाहतूक काही वेळ खोळंबली होती. अग्निशामक दलाचे एस. एन. पेडणेकर, नारायण मोर्लेकर व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी झाड कापून हटविले व वाहतुकीस रस्ता मोकळा केला.
तिसऱ्या घटनेत गेला युवतीचा बळी
चर्च चौक परिसरात या पावसाळी हंगामात झाड पडण्याची ही तिसरी घटना आहे. पहिल्या घटनेत झाडाची एक मोठी फांदी तुटून पडली होती. त्यावेळी कोणतेही नुकसान झाले नाही. दुसऱ्या घटनेत कामत हॉटेल समोरील झाड पडून चार दुचाकी आणि दोन चारचाकींचे नुकसान झाले होते. तर काल रविवारी घडलेल्या तिसऱ्या घटनेत युवतीचा बळी गेला आहे.
धोकादायक झाडे कापावी : नागरिकांची मागणी
गेल्या पंधरा दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. ठिकठिकाणी झाडे, घराच्या भिंती, संरक्षक भिंती कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच जीवितहानी झाली आहे. पणजीत ठिकठिकाणी आवाढव्य जुनाट झाडे आहेत. ती धोकादायक बनली आहेत. आणखी कुणाचा बळी जाण्यापूर्वी मनपाने वेळीच दखल घेऊन ती झाडे कापावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.