12 वीच्या विद्यार्थ्याने दिली होती बॉम्बची धमकी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीच्या शाळांना बॉम्बची धमकी एका 12 वीच्या विद्यार्थ्याने दिली होती. दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. परीक्षा देण्याची इच्छा नव्हती याचमुळे बॉम्ब असल्याची धमकी देणारा ईमेल पाठविला होता, तर संशय वाटू नये म्हणून स्वत:च्या शाळेसोबत दिल्लीच्या 23 शाळांना ईमेलमध्ये टॅग केले होते, असे आरोपी विद्यार्थ्याने चौकशीदरम्यान सांगितले आहे.
या विद्यार्थ्याने यापूर्वीही 5 वेळा शाळांना धमकी दिली होती, असे दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आले. बुधवारी काही शाळांना खोटी धमकी मिळाली होती. यात दिल्लीतील अनेक शाळा सामील होत्या. धमकीनंतर या शाळांमध्ये तपासणी करण्यात आली होती, परंतु काहीच संशयास्पद हाती लागले नव्हते. शाळेत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बॅगची कसून तपासणी होत नसल्याने धमकीचा ईमेल पाठविण्याची संधी मिळाली होती असेही या विद्यार्थ्याने चौकशीत सांगितले आहे.