कारिवडे येथील १०१ वर्षाच्या आजींनी बजावला मतदानाचा हक्क !
लोकसभा निवडणुकीसाठी गावागावात टपाली मतदान प्रक्रियेस प्रारंभ
ओटवणे | प्रतिनिधी
रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर जे ज्येष्ठ ग्रामस्थआणि दिव्यांग जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी बुधवारपासून गावागावात टपाली मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला. या टपाली मतदान प्रक्रिया पथकात दोन मतदान अधिकारी, मायक्रो ऑब्झर्वेशन, छायाचित्रकार आणि पोलीस या पाच जणांचा समावेश आहे
मतदाना दिवशी जे शासकीय अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्रावर कार्यरत असतात. त्यांचे टपाली मतदान मंगळवारी घेण्यात आले. त्यानंतर या मतदान प्रक्रियेतील काही अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत ज्येष्ठ ग्रामस्थ आणि दिव्यांगांसाठी गावागावात टपाली मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. यापूर्वी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अशा पद्धतीचे टपाली मतदान बिहार राज्यात घेण्यात आले होते.
ज्येष्ठ ग्रामस्थ आणि दिव्यांगांच्या घरी जाऊन हे टपाली मतदान घेण्यात येत आहे. ईतर निवडणुकीतील नियमाप्रमाणे आणि गुप्त पद्धतीने हे मतदान घेण्यात येत आहे. या टपाली मतदानासाठी ज्येष्ठ ग्रामस्थ किव्हा दिव्यांग पहिल्या वेळेस घरी न भेटल्यास पुन्हा दुसऱ्या वेळी घरी जाऊन हे मतदान घेण्यात येणार आहे. कारिवडे- भैरववाडी येथील १०१ वर्षाच्या आनंदी लक्ष्मण तळवणेकर यांच्या घरी जाऊन गुप्त पद्धतीने टपाली मतदान घेण्यात आले.