दिल्लीत 180 कोटींच्या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश
दोघांना अटक : बनावट कंपन्यांद्वारे पैशांचे हस्तांतरण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकाने बनावट कंपन्यांद्वारे सायबर गुह्यांचे पैसे लाँड्रिंग करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील सुशील चावला आणि गुरुग्राम येथील राजेश कुमार या दोघांना अटक करत सायबर फसवणुकीचा प्रकार उघड केला. सायबर गुह्यांद्वारे फसवणूक करण्यासाठी आरोपींनी बनावट 20 वेगवेगळ्या कंपन्या उघडल्याचे स्पष्ट झाले आहे.
सायबर नेटवर्कशी जोडलेल्या खात्यांद्वारे देशभरात अंदाजे 180 कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार आढळून आले आहेत. एनसीआरपी पोर्टलवर यासंबंधी 176 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी आरोपींकडून दोन मोबाईल फोन आणि एक लॅपटॉप जप्त केला आहे. देशभरात नोंदवलेल्या इतर प्रकरणांशी या नेटवर्कला जोडण्यासाठी पोलिसांनी जप्त केलेले मोबाईल फोन, लॅपटॉप आणि बँक खात्यांची माहिती भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राला पाठवली आहे.
संशयास्पद व्यवहार
एनसीआरपी पोर्टलवर दाखल झालेल्या तक्रारींच्या चौकशीदरम्यान आयडीएफसी बँकेच्या खात्यात संशयास्पद व्यवहार वारंवार नोंदवल्याचे दिसून आले. हे खाते बाराखंबा रोडवरील पत्त्यावर असलेल्या मेसर्स कुद्रेमुख ट्रेडिंग (ओपीसी) प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने नोंदणीकृत असल्याचे आढळून आले. तपासात एकूण रक्कम अंदाजे 180 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.