इंधनात इथेनॉल मिश्रणातून 99 हजार कोटींची बचत
केंद्रीय मंत्री हरदिपसिंग पुरी यांची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वाहन इंधनात इथेनॉल मिसळण्याच्या कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत सरकारने 99 हजार कोटींची बचत केली असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदिप सिंग पुरी यांनी दिली आहे. ते म्हणाले, 2014 पासून इंधनात इथेनॉल मिश्रण करण्याची योजना राबवली जात असून विदेशी चलनात पाहता आतापर्यंत सरकारने 99,014 कोटी रुपयांची बचत केली आहे.
सध्याला 15 टक्के इथेनॉलचा वापर
आर्थिक वर्ष 2025-26 पर्यंत इंधनात 20 टक्के इतके इथेनॉल मिसळण्याचे उद्दिष्ट असून सध्याला 15 टक्के इतके मिश्रण म्हणून वापरले जात आहे. 2014 पासून जवळपास 17.3 दशलक्ष मेट्रीक टन व्रुड तेलाची आयात इथेनॉलच्या वापरामुळे कमी झाली आहे. याचप्रमाणे कार्बनच्या प्रदुषणातही 51.9 दशलक्ष मेट्रीक टनने दशकभरात कपात करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्पादन वाढीला देणार गती
याचदरम्यान सरकार इथेनॉलच्या निर्मितीत वाढ करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने खाद्य मंडळ, भारत यांच्याकडून इथेनॉल निर्मिती केंद्रांना तांदळाचा पुरवठा सुरु केला आहे. ऑगस्ट 2024 ते ऑक्टोबर 2024 पर्यंत इऑक्शनमार्फत 23 लाख टन खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासोबत उसाचा रसदेखील लवकरच पुरवून इथेनॉल उत्पादनात वाढ करण्यात येणार आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.