For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

99 टक्के लहानगी मोबाईलच्या आहारी

12:41 PM Jun 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
99 टक्के लहानगी मोबाईलच्या आहारी
Advertisement

बेळगावसह पाच जिल्ह्यातील अध्ययनातून धक्कादायक अनुभव : शहरी तसेच ग्रामीण मुलांचाही स्क्रीनटाईम धोकादायक

Advertisement

बेळगाव : बेळगावसह राज्यातील पाच जिल्ह्यात ऑनलाईन धोक्यांसंबंधी झालेल्या अध्ययनात धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. 99 टक्के लहान मुलांना मोबाईलचे अक्षरश: व्यसन लागले आहे. यामध्ये ग्रामीण भागातील मुलांचा स्क्रीन टाईम अधिक असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे मोबाईलच्या अतिवापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांवर प्रकाश पडला आहे. बाल हक्क संरक्षण आयोग व चाईल्ड फंड इंडिया यांनी संयुक्तपणे राज्यातील मुलांच्या ऑनलाईन धोक्यांविषयी अभ्यास करून अहवाल तयार केला आहे. या अहवालात मोबाईलमुळे घराघरात, गावागावात कशा समस्या निर्माण होत आहेत, यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी बेंगळूर येथील विधानसौधमध्ये यासंबंधीचा अहवाल विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

या अहवालावर सभापतींनीही चिंता व्यक्त केली असून लहान मुलांचा वाढता स्क्रीन टाईम, ऑनलाईनचा वापर व मोबाईलचा अतिवापर यामुळे त्यांच्यावर होणाऱ्या परिणामांविषयी गांभीर्याने चर्चा झाली पाहिजेत, अशी भूमिका सभापतींनी मांडली आहे. विधान परिषदेतही आपण याविषयी चर्चेला अवकाश देणार आहे. विधिमंडळातील चर्चेनंतर लहान मुलांवरील मोबाईलचा दुष्परिणाम रोखण्यासाठी काटेकोर नियम तयार करण्यासंबंधी निर्णय घेण्यात येईल, असे सभापतींनी सांगितले आहे. अध्ययन अहवालातील नोंदी धक्कादायक असून 15 ते 18 वयोगटातील सुमारे 25 टक्के मुले रोज एक तासाहून अधिक वेळ मोबाईलचा वापर करतात. कर्नाटक राज्य बाल हक्क संरक्षण आयोग व चाईल्ड फंड इंडिया संस्था यांनी बेंगळूर, बेळगाव, चामराजनगर, चिक्कमंगळूर व रायचूर जिल्ह्यातील 8 ते 18 वर्षे वयोगटातील 900 हून अधिक मुलांवर अभ्यास केला आहे. 8 ते 11 वर्षांपर्यंतची 87 टक्के मुले मोबाईलचा वापर करीत आहेत. 15 ते 18 वयोगटातील 99 टक्के मुले व याच वयोगटातील 100 टक्के मुली मोबाईलच्या आहारी गेल्या आहेत.

Advertisement

मुलांचे ऑनलाईन लैंगिक शोषण 

केवळ लहान मुलांवरच अभ्यास झाला नाही तर त्यांच्या पालकांचीही भेट घेऊन त्यांच्याकडून माहिती घेण्यात आली आहे. 42 टक्के पालकांनी अध्ययनात धक्कादायक माहिती दिली आहे. आपल्या मुलांचे ऑनलाईन लैंगिक शोषण झाल्याची माहिती त्यांनी दिली असून 43 टक्के मुलांना धमक्याही आल्या आहेत. या अध्ययनातील आकडेवारी नागरी समाजाला थक्क करणारी आहे. खास करून शहरी व ग्रामीण भागातील मुलांचा अभ्यास करण्यात आला आहे. 97 टक्के लहान मुले मोबाईल, लॅपटॉपचा वापर करतात. शहरी भागातील 93 टक्के मुले मोबाईल व लॅपटॉप वापरतात. शहरापेक्षाही ग्रामीण भागातील प्रमाण अधिक आहे. 8 ते 11 वर्षे वयातील 96 टक्के, 15 ते 18 वर्षे वयातील 71 टक्के मुले मोबाईल व लॅपटॉप वापरतात.

अनोळखींशी मैत्री 

12 ते 14 वर्षे वयोगटातील 97 टक्के मुले युट्यूब बघतात. याच वयोगटातील 92 टक्के मुले व्हॉट्सअॅप व 73 टक्के मुले सर्च इंजीनचा वापर करतात. 18 वर्षे वयोगटातील सुमारे 16 टक्के मुले अनोळखींबरोबर मैत्री करतात. त्यासाठीच ते मोबाईलचा अतिवापर करतात. तर 10 टक्के मुले ऑनलाईनच्या माध्यमातून अनोळखींशी मैत्री करून त्यांची भेट घेतात. 8 टक्के मुलांनी आपले फोटोही शेअर केल्याचे अध्ययनात उघडकीस आले आहे.

मोबाईलशिवाय मुले जेवण करीत नाहीत

वाढत्या स्क्रीन टाईममुळे प्रत्येक माणसाच्या मनावर, त्याच्या शरीरावर होणाऱ्या परिणामाविषयी अनेक संशोधने झाली आहेत. कोरोनानंतर दुष्परिणामांचाही विचार न करता मोबाईलचा वापर वाढला आहे. मोबाईलवर एखादे गाणे किंवा व्हिडिओ लावून दिल्याशिवाय मुले जेवण करीत नाहीत. अनेक पालकांना हा अनुभव आहे. आपली मुले काही तरी पोटाला खाऊ देत म्हणून त्यांच्या हातात मोबाईल दिला जातो.  मोबाईल बघत मुले जेवण करतात, असा अनुभव अनेकांना आहे. आता बाल हक्क संरक्षण आयोगाने केलेल्या अध्ययनात धक्कादायक माहिती उघडकीस आली असून मोबाईलचे व्यसन कसे सोडवायचे? हा मोठा प्रश्न आहे.

Advertisement
Tags :

.