महात्मा फुले भाजी मार्केटसह 98 गाळ्यांचा होणार लिलाव
महापालिकेचा पुढाकार : ई-लिलावाद्वारे होणार वितरण : उत्पन्नात आणखी भर पडणार
बेळगाव : महापालिकेच्या मालकीच्या महात्मा फुले भाजी मार्केटसह शहरातील विविध भागातील 98 गाळ्यांचा लिलाव केला जाणार आहे. ई-लिलावाच्या माध्यमातून सदर गाळे बारा वर्षांसाठी मासिक भाडेकरार तत्त्वावर दिले जाणार आहेत. या माध्यमातून महापालिकेच्या उत्पन्नात आणखी भर पडणार आहे. गणपत गल्ली येथील 2 गाळे, महात्मा फुले भाजी मार्केट येथील 9, कोलकार मार्केट येथील 8, सीबीटी कॉम्प्लेक्समधील 14, माळमारुती वसाहतीतील 10, किर्लोस्कर रोडवरील 1, सीबीटी मिनी कॉम्प्लेक्समधील 6, अशोकनगर स्मार्ट कॉम्प्लेक्स कँटीनमधील 1,
कसाई गल्ली, मटण मार्केट येथील 38, कसाई गल्ली स्लॉटर हाऊस 1, कसाई गल्ली बकरी शेड येथील 1 आणि कसाई गल्ली मासळी मार्केट येथील 7 अशा एकूण 98 गाळ्यांचा लिलाव केला जाणार आहे. कर्नाटक सरकारच्या आदेशानुसार सदर गाळे लिलावाच्या माध्यमातून विक्री केले जाणार आहेत. मासिक भाडेकरार तत्त्वावर 12 वर्षांसाठी संबंधितांना गाळे दिले जाणार आहेत. गाळ्यांच्या लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी संबंधित पोर्टलच्या माध्यमातून आपले अर्ज दाखल करायचे आहेत. यापैकी 18 टक्के गाळे अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांसाठी दिले जाणार आहेत. तसेच 50 टक्क्यांहून अधिक अपंगत्व असलेल्यांनी आपले प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे.
28 रोजी लॉटरी माध्यमातून वितरण
गाळे क्र. 62 आणि 63 यांचे महापालिकेच्या सुभाषनगर येथील मुख्य कार्यालयात 28 मार्च रोजी सकाळी 11 वा. लॉटरीच्या माध्यमातून वितरण केले जाणार आहे. लिलाव प्रक्रियेच्या स्पष्टीकरणाची अंतिम तारीख 21 मार्च असून 26 मार्च 2025 सायंकाळी 5 पर्यंत लिलाव प्रक्रियेत भाग घेण्याचा अखेरचा दिवस आहे. 28 मार्च 2025 रोजी सकाळी 11 ते 4 पर्यंत लिलाव प्रक्रिया राबविली जाणार आहे. लिलाव प्रक्रियेत भाग घेणाऱ्यांनी अधिक माहितीसाठी मनपा महसूल शाखेतील अधिकाऱ्यांशी कार्यालयीन वेळेत भेट घेऊन माहिती घ्यावी, असे आवाहन केले आहे.